बापरे! मदतीसाठी किंचाळणाऱ्या तरुणीचे घुमजाव झाल्याने तरुणांची 'हवा गुल'; नक्की काय घडलं बघा

By नरेश डोंगरे | Published: September 5, 2022 08:12 PM2022-09-05T20:12:28+5:302022-09-05T20:13:12+5:30

'तो', 'ती' अन् 'ते'... हिंगणा मार्गावर झाली सिनेमा स्टाईल घटना

Crime News in Nagpur as Boy beats girl turned out to be husband wife | बापरे! मदतीसाठी किंचाळणाऱ्या तरुणीचे घुमजाव झाल्याने तरुणांची 'हवा गुल'; नक्की काय घडलं बघा

बापरे! मदतीसाठी किंचाळणाऱ्या तरुणीचे घुमजाव झाल्याने तरुणांची 'हवा गुल'; नक्की काय घडलं बघा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शनिवार, रात्री ११.१५ ची वेळ. तेवढ्या रात्रीदेखील हिंगणा मार्गावर वाहनांची बऱ्यापैकी वर्दळ. टी पॉइंटवर (चाैकाच्या बाजूला) तरुणांचा घोळका चर्चा करीत असतो. अचानक एक स्पोर्ट बाईक स्केट करते. त्या आवाजामुळे चाैकातील तरुणांचे लक्ष वेधले जाते. बाईकवर बसलेले तरुण-तरुणी खाली उतरतात. दोघेही बरमुडा, टी-शर्ट घातलेले. अचानक तरुण त्याच्या सोबतच्या तरुणीचा क्लास घेणे सुरू करतो. बाचाबाची वाढते अन् तो तिला बदडणे सुरू करतो. त्याचा तो अवतार बघून तरुणी बाजूलाच पळून जाते अन् एका कारच्या मागे लपते.

दोन-चार मिनिटांच्या ब्रेकनंतर तरुण तिच्या जवळ जातो अन् पुन्हा तिला लाथा-बुक्क्यांनी बदडणे सुरू करतो. ती किंचाळते, ओरडते. धोक्याचे संकेत मिळाल्याने घोळक्यातील तरुण तिकडे धावतात. त्या तरुणाची धुलाई करण्याचा काहींचा मानस असतो, तर एक जण त्यांना सबुरीचा सल्ला देऊन आधी पोलिसांना फोन करून बोलवून घेण्याची सूचना करतो. दरम्यान, हे चार-पाच तरुण ‘त्या’ दोघांजवळ पोहोचतात. ‘क्या हुवां मॅडम’ अशी विचारणा करतात. ती आपबीती सांगेल अन् नंतर तिला बदडणाऱ्याला बुकलून काढता येईल, या मानसिकतेत असलेल्या तरुणांची हवा ती तरुणी झटक्यात गुल करते. बचावासाठी आलेल्या तरुणांना ‘ती’ आपसे मतलब, असा सवाल करते. तो सवाल मदतीसाठी आलेल्या तरुणांची बोलती बंद करणारा ठरतो.

साधारणत: १० मिनिटांपूर्वी बचावासाठी किंचाळणारी ती तरुणी आता मात्र निर्ढावलेपणा दाखवते. परिणामी काय बोलावे, काय विचारावे, असा प्रश्न या तरुणांना पडतो. उसने अवसान आणून एक जण विचारतो, ‘ये आपको क्यू मार रहा था’, या प्रश्नावर ‘हम मिस्टर - मिसेस है. हमारा आपसी मामला है. थोडीसी मिसअंडरस्टँडिंग हुयी है. बाकी कुछ नही’, असे उत्तर देते. तिने केलेले घुमजाव आता या तरुणांना माघारी फिरण्याचाच एकमात्र पर्याय शिल्लक ठेवतो. काहीसा अपमानित झाल्याचा फिल आल्यामुळे चार-पाचही तरुण ‘मॅडम, मिसअंडरस्टँडिंग हुयी तो घर मे जाओ, रस्ते पर क्यू तमाशा कर रहे हो’, असे म्हणत दोघांनाही फटकारतात. ते तरुण ॲग्रेसिव्ह झाल्याचे लक्षात येताच आतापर्यंत कथित हजबंडपासून दूर पळणारी तरुणी लगेच त्याला बाईक सुरू करायला लावते अन् मागे बसत घट्ट बिलगून मदतीसाठी आलेल्या तरुणांना वाकुल्या दाखवत सुसाट वेगाने निघून जाते.

'सॅटरडे नाईट'ला दिसते ‘बेधुंद’ वर्तन

उपराजधानीच्या रस्त्यांना रात्रीचा हा गोंधळ नवीन नाही. सर्वसामान्यपणे शनिवारी रात्रीच्या वेळेस हमखास विविध भागात ‘बेधुंद तरुण-तरुणीं’चे आक्षेपार्ह वर्तन बघायला मिळते. कुठे तरुणांचे गट तरुणींसाठी भांडतात. तर कुठे एखाद्या तरुणासाठी दोन तरुणी त्यांच्या मैत्रिणींसह रस्त्यावरच एकमेकींचा हिशेब चुकता करताना दिसतात. कुठे संशयात बुडालेले प्रेमी युगुल एकमेकांची वाट लावतानाही बघायला मिळतात.

पोलिसांनाही वाटते तिच्या आरोपाची भीती

चुकून कुणी समजावण्याचा प्रयत्न केला किंवा पोलीस त्यावेळी तेथे पोहोचले तर तरुणापेक्षा तरुणीच त्यांचा सामना करते. ‘हम बालिग है, हम कुछ भी करे, आपको क्या करना है’, असा प्रश्न करून पोलिसांना मार्गी लावतात. अनेकदा तिने भलताच आरोप लावू नये, या भीतीमुळे सर्वसामान्य माणूसच नव्हे तर पोलीसही तिच्याशी पंगा घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत.

Web Title: Crime News in Nagpur as Boy beats girl turned out to be husband wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.