बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 11:15 AM2022-04-27T11:15:27+5:302022-04-27T11:23:12+5:30
पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी कांबळेला अटक केली.
नागपूर : जरीपटक्यातील एका युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोन दिवसानंतर नवीन ट्वीस्ट आल्याने हे प्रकरण आता सामूहिक बलात्काराचे ठरले आहे. तक्रार करणाऱ्या युवतीचे वय १८ वर्षाला एक महिना कमी आहे. त्यामुळे या प्रकरणात पोक्सोही लावण्यात आला आहे.
युवती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून ती बुटीबोरीला अभ्यासासाठी मैत्रीणीसह रुम करून राहते. तिचे यश कांबळे सोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी त्यांच्या मधुर संबंधाचे अनेक फोटो, व्हिडिओही मोबाइलमध्ये साठवून ठेवले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १७ एप्रिलला यशने तिला आपल्या रुमवर बोलवले अन् तिच्याशी शरीरसंबंध जोडले. रविवारी, २४ नोव्हेंबरला यश पुन्हा तिच्या रुमवर बुटीबोरीला पोहचला अन् त्याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. तो उलटसुलट बोलत असल्याने तिने आपल्या आईला फोन करून माहिती दिली. त्यानंतर ती नागपुरात आली. आईला तिने १७ एप्रिलला यश कांबळेने बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी कांबळेला अटक केली.
‘त्यांनीही झडप घातली’
दरम्यान, सोमवारी तरुणीची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करवून घेतली. यावेळी १७ एप्रिलला यश कांबळेने बलात्कार केला तेव्हा त्याचे दोन मित्र बाजूच्या रुममध्ये लपून होते. त्यांनीही नंतर आपल्यावर झडप घालून बलात्कार केल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.
जरीपटका ठाण्यात धावपळ
सामूहिक बलात्कारात हे प्रकरण मोडत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आली. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून जरीपटका ठाण्यात धावपळ वाढली. मंगळवारी नव्याने जबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणात यशचे साथीदार रिशिल उर्फ चिकू आणि रक्षीत खोब्रागडे या दोन भावांविरुद्ध गुन्हा नोंदवून मंगळवारी रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामुळे जरीपटक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.