रेवती डेव्हलपर्सच्या संचालकावर गुन्हा
By admin | Published: May 23, 2016 03:02 AM2016-05-23T03:02:24+5:302016-05-23T03:02:24+5:30
मोक्याच्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त भूखंड देण्याची बतावणी करून भूखंड विकणाऱ्या रेवती असोसिएटस्च्या ठगबाज संचालक दाम्पत्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ठगबाज मोरे दाम्पत्य : साडेचार लाख हडपले
नागपूर : मोक्याच्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त भूखंड देण्याची बतावणी करून भूखंड विकणाऱ्या रेवती असोसिएटस्च्या ठगबाज संचालक दाम्पत्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुहास रत्नाकर मोरे (वय ४२) आणि विद्या सुहास मोरे (रा. रामदासपेठ) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी सुहास मोरेचे धंतोलीत रेवती असोसिएटस् आणि ओम लॅण्ड डेव्हलपर्स नावाने कार्यालय आहे. बेरोजगार तरुणांना हाताशी धरून आणि मोठमोठे होर्डिंग लावून आरोपी मोरेने सर्वसुविधायुक्त भूखंड माफक दरात विकण्याची जाहिरात केली. त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडून भूखंड विकत घेण्याचा करार करून मोरेला लाखो रुपये दिले. चंद्रपूरच्या रेवती आॅफीस कॉलनीत राहणारे ननदिया पिविटकुमार सेन यांनीही मोरेकडून मौजा परसोडी येथील लेआऊटमधून तीन भूखंड विकत घेण्याचा सौदा केला. २२ एप्रिल २०१५ ते २१ मे २०१६ या कालावधीत आरोपीला ४ लाख, ४० हजार रुपये दिले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपी भूखंडाची विक्री करून देण्यास टाळाटाळ करू लागला. त्याने फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने सेन यांनी शनिवारी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती. (प्रतिनिधी)
एका आठवड्यात
दुसरा गुन्हा
मोरेविरुद्ध एका आठवड्यात दाखल झालेला फसवणुकीचा हा दुसरा गुन्हा होय. त्याने अशाच प्रकारे छापरूनगरातील राजेश भिवतोंडे यांचेही १५ लाख रुपये हडपले. राजेशच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी आरोपी सुहास मोरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.