नागपुरातील माय डायल डिजिटलच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 08:18 PM2018-11-24T20:18:40+5:302018-11-24T20:24:06+5:30
प्रत्येक महिन्याला २० टक्के रक्कम नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाहिरातीसाठी एलईडी होर्डिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या येथील माय डिजिटल कंपनीच्या बनवाबनवीचा फुगा अखेर फुटला. कंपनीचा संचालक आकाश सरोदे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सदर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. सरोदे आणि त्याच्या साथीदारांनी विविध प्रांतातील ठेवीदारांना पावणेचार कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक महिन्याला २० टक्के रक्कम नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाहिरातीसाठी एलईडी होर्डिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या येथील माय डिजिटल कंपनीच्या बनवाबनवीचा फुगा अखेर फुटला. कंपनीचा संचालक आकाश सरोदे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सदर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. सरोदे आणि त्याच्या साथीदारांनी विविध प्रांतातील ठेवीदारांना पावणेचार कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
सरोदे आणि साथीदारांनी छावणी सदरमधील गोंडवाना चौकातील इमारतीत माय डायल डिजिटल एलईडी अॅन्ड मीडिया प्रा. लि. कंपनी नावाने तीन वर्षांपूर्वी दुकानदारी सुरू केली होती. आपल्या कंपनीला प्रधानमंत्री स्मार्ट सिटी एलईडी प्रकल्पांतर्गत देशातील विविध शहरांत डिजिटल होर्डिंगद्वारे जाहिरात प्रसारणाचे कंत्राट मिळाले आहे, अशी बतावणी ते करीत होते. काम खूप मोठे आणि नफा खूप जास्त असल्याने यात गुंतवणूक करणाऱ्यांना महिन्याला २० टक्के रक्कम नफा मिळेल. अर्थात, एक लाख रुपये गुंतविल्यास पुढच्या १० महिन्यात प्रत्येकी २० हजार रुपये मिळतील. म्हणजेच १० महिन्यात तुमची रक्कम दुप्पट होईल. तुम्ही तुमच्या ओळखीच्यांना, नातेवाईकांना गुंतवणुकीस प्रोत्साहित केल्यास तुम्हाला तुमचे वेगळे कमिशन मिळेल, असेही आरोपी सांगत होते. त्याला बळी पडून डेहराडून (उत्तराखंड) मधील शाहनगरात (डिफेन्स कॉलनी) राहणाऱ्या पार्वती सूरजमनी चमोली (वय २८) यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी ५२ लाख ५६ हजार तर, त्यांच्या ओळखीच्यांनी २ कोटी ४८ लाख ४२ हजार २०० रुपये गुंतविले. एलईडी खरेदीच्या नावाखाली ५६ लाख ५० हजार ५०० रुपये जमा केले. अशाप्रकारे ३ नोव्हेंबर २०१७ पासून चमोली आणि त्याच्या ओळखीच्यांनी सरोदे आणि साथीदारांच्या कंपनीत एकूण ३ कोटी ५७ लाख ४८ हजार रुपये गुंतविले. सुरुवातीचे दोन महिने व्याज दिल्यानंतर सरोदे आणि साथीदारांनी त्यांना टाळणे सुरू केले. संशय आल्यामुळे सरोदे आणि साथीदारांची भेट घेण्यासाठी २३ जुलै २०१८ ला डेहराडूनमधील मंडळी नागपुरात आली. येथे आल्यानंतर त्यांना त्यांच्यासारखीच अनेकांची रक्कम आरोपींनी हडपल्याचे त्यांच्या ध्यानात आले.
त्यामुळे त्यांनी आपली रक्कम परत मागण्यासाठी सरोदे आणि कंपनीच्या मागे तगादा लावला. प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करणाऱ्या आरोपींनी नंतर आपले कार्यालयही बंद केले. आपली रक्कम परत मिळणार नाही, अशी खात्री पटल्याने अखेर चमोली आणि त्यांच्या नातेवाईकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आकाश हरिदास सरोदे (वय ४०, रा. वैशाली नगर, पाचपावली), अभिजित गोपाल देव (वय ३२) आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचे कलम ४२०, ४०६, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंध संरक्षण कायद्याचे सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.