कोर्टाच्या आदेशानंतर सहा पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे
By admin | Published: December 19, 2014 12:41 AM2014-12-19T00:41:43+5:302014-12-19T00:41:43+5:30
सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी भगवान पाटेकर यांची बाजू उचलून धरत उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे
निवृत्त डीवायएसपीवर भ्रष्टाचाराचा आरोप
अमरावती : सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी भगवान पाटेकर यांची बाजू उचलून धरत उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूकप्रकरणी या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मंगलजित सिरम, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण धोटे, निरीक्षक गिरीश बोबडे यांच्यासह सहा अधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आले होते. आरोपाच्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक असलेले मंगलजित सिरम, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण धोटे, निरीक्षक गिरीश बोबडे यांच्याशिवाय एकनाथ खडसे, अरविंद पांडे आणि संतोष वर्मा यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. माहितीनुसार, या पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
भगवान पाटेकर हे पोलीस निरीक्षक असताना त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी होते. या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा केल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निनावी पत्राद्वारे कळविण्यात आले होते. त्यावेळी एसीबीचे अधीक्षक सिरम यांच्यासह वरील अधिकाऱ्यांनी पाटेकर यांच्या संपत्तीची चौकशी केली. आरोपानुसार पाटेकर यांना यामध्ये अडकविण्यासाठी बनावट दस्तऐवजांच्या आधारे निलंबितही करण्यात आले होते. मात्र पाटेकर यांच्या म्हणण्यानुसार वरील अधिकारी त्यांना अडकविण्यासाठी प्रयत्न करीत होते. २२ सप्टेंबर २००६ रोजी पाटेकर यांनी या आरोपासंदर्भात फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, तत्कालीन ठाणेदार शिवा ठाकूर यांनी त्यांची तक्रार न घेता ज्यांच्याविरोधात तक्रार आहे ते वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे यासंदर्भात गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यामुळे पाटेकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही एसीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात पाटेकर यांच्या बाजूने निर्णय दिला होता. याबाबतच्या प्रती दोन दिवसांपूर्वीच स्थानिक न्यायालयाला प्राप्त झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी एसपी मंगलजित सिरम यांच्यासह सहा अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी सायंकाळी गुन्हे दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)