मनोरुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 03:43 PM2022-06-10T15:43:39+5:302022-06-10T15:48:50+5:30
तत्कालीन 'पीआय'चाही समावेश; दोरीने बांधून केली होती मारहाण, पोलिसांच्या वाहनातच झाला होता मृत्यू
नागपूर : २०१९ साली मोठा ताजबाग परिसरातील एका मनोरुग्णाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात सक्करदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित सिद व पोलीस हवालदार कैलास दामोदर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ सप्टेंबर २०१९ रोजी ताजबाग परिसरात फैजान अहमद नसीब अली (३६) हा फिरत असताना त्याला तेथील काही तरुणांनी मारहाण केली होती. संबंधित तरुण येणाऱ्या-जाणाऱ्यांना शिवीगाळ करत दगड फेकून मारत असल्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षालादेखील प्राप्त झाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावरदेखील तो आक्रमकच होता. मनोरुग्ण असल्याचे माहिती असूनदेखील पोलिसांनी त्याला दोरीने बांधून मारहाण केली.
पोलिसांशी झालेल्या झटापटीत त्याचे डोकेदेखील जमिनीवर आदळले होते. त्याला वेळेवर वैद्यकीय मदतदेखील मिळवून दिली नाही. तो मानसिक रुग्ण असूनदेखील त्याच्याशी अमानुषपणे व्यवहार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याला पोलीस मॅजिस्ट्रेटसमोर घेऊन गेले. जेवणाची सुटी असल्याने त्याला वाहनातच बसवून ठेवले होते. तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांच्या वाहनातच त्याचे शव सापडले होते. हे प्रकरण त्यावेळी गंभीरतेने घेण्यात आले होते व चौकशी सुरू झाली होती.
मानसिक आजार तसेच शारीरिक जखमांवर वैद्यकीय उपचार न देणे व मनोरुग्ण फैजान याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असूनही त्याची सोबत अमानुष वागणूक करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच मेहरास सर्फुद्दिन शेख, युसुफ हसन खान, अन्वर हुसेन जिगरी भाई तसेच एका अनोळखी इसमाचा यात समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली.