नागपुरातील गुन्हेगार दत्तक योजना बासनात गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:29 AM2019-06-25T10:29:38+5:302019-06-25T10:32:02+5:30

शहर पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली गुन्हेगार दत्तक योजना अनेक पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बासनात गुंडाळून ठेवली आहे.

The criminal adoption scheme of Nagpur got bundled | नागपुरातील गुन्हेगार दत्तक योजना बासनात गुंडाळली

नागपुरातील गुन्हेगार दत्तक योजना बासनात गुंडाळली

googlenewsNext
ठळक मुद्देमैत्रीपूर्ण ‘व्यवहारा’मुळे गुन्हेगार निर्ढावलेगंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली गुन्हेगार दत्तक योजना अनेक पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बासनात गुंडाळून ठेवली आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगार निर्ढावले आहेत. त्याचमुळे हत्या, हत्येचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला यासारखे गंभीर गुन्हे सारखे वाढत आहेत. सुरू असलेल्या जून महिन्यात घडलेल्या मोठमोठ्या गंभीर गुन्ह्यांमुळे उपराजधानीत पुन्हा गुन्हेगारी वळवळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी अनेक उपक्रम राबविण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. शहरातील तीन हजारांवर गुन्हेगारांची सचित्र माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यात उपलब्ध करून देण्यात आली. हे गुन्हेगार काय करतात, कुठे जातात, कुठे बसतात, त्यांचा उदरनिर्वाह सध्या कसा सुरू आहे, यासंबंधीची बारीकसारीक माहिती काढून त्यांच्यावर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना काही महिन्यांपूर्वी नागपुरात सुरू करण्यात आली होती. त्यानुसार, छोटे-मोठे गुंड रोज घरी आहे की नाही, ते तपासण्यासाठी ‘सेल्फी’योजनाही सुरू करण्यात आली होती. ती काटेकोरपणे राबविण्यात येईपर्यंत शहरातील गुन्हेगारी नियंत्रित होती. मात्र, अनेक पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चिरीमिरीसाठी ही योजना बासनात गुंडाळली.
अवैध धंद्यांना मूकसंमती देत गुन्हेगारांना रान मोकळे करून दिले. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. त्याचमुळे ते शहराच्या रस्त्यांवर खुनाचा सडा घालत आहेत. महिना संपायला अजून आठवडा आहे. मात्र, सुरू असलेल्या जून महिन्यात मोठमोठे हत्याकांड शहरात घडले आहेत. त्यातील चमचम हत्याकांड, तेवर हत्याकांड, शेरा हत्याकांड, विजय मोहोड हत्याकांड आणि बाबा चौधरी हत्याकांडाचा उल्लेख करता येईल. उपरोक्त हत्याकांडापैकी तेवर हत्याकांड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडले तरी मृत आणि त्याची हत्या करणारे गुन्हेगार शहरातीलच आहेत.
हे सर्वच्यासर्व गुन्हे पोलिसांच्या रेकॉर्डवर खतरनाक गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या कुख्यात गुंडांनी केले आहेत. त्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या हालचालीवर नजर ठेवली जात नसल्यामुळेच हे गुन्हे घडत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांची गय करू नका, असे आदेश दिले आहेत.
मात्र, अनेक पोलीस ठाण्यातील मंडळी या गुन्हेगारांकडून महिन्याला तगडी रक्कम मिळावी म्हणून त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासत आहेत.
अनेक गुन्ह्यात लाखोंची तोडपाणी करण्यासाठी याच गुन्हेगारांकडून मांडवली करवून घेत आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगारांना पोलीस मित्रांसारखे वाटू लागले आहेत. पोलिसांची भीती उरली नसल्यामुळे गुन्हेगार निर्ढावत आहेत आणि रान मोकळे झाल्यासारखे ते गंभीर गुन्हे करीत फिरत आहेत.

वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना
पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व पोलीस उपायुक्त असे शहरातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्राच्या पोलीस ठाण्यातील मंडळींना नियमित दिशानिर्देश देत आहेत. अनेक गुंडांच्या टोळ्यांवर मोक्का, एमपीडीए, तडीपारीची कारवाई केली जात आहे. पोलीस आयुक्तांनी चार दिवसांपूर्वी शहरातील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी अनेकांचे कान टोचले. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांनीही तीन दिवसांपूर्वी ठाणेदारांना कडक सूचना दिल्या. मात्र, खाबूगिरीसाठी चटावलेले अनेक ठाणेदार आणि त्यांच्या अधिनस्थ मंडळी पुरेशी काळजी घ्यायला तयार नाही. ते वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करीत आहेत. गुन्हेगारांबाबत कडक धोरण राबवायची त्यांची मानसिकता नसल्यामुळेच उपराजधानीतील गुन्हेगारी वाढत आहे.

शस्त्रे घेऊन फिरणारे दिसत का नाही ?
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना योग्य साधन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पुरेसे नसले तरी बºयापैकी प्रत्येक पोलीस ठाण्यात मनुष्यबळ आहे. त्यांनी गुन्हेगारांवर वचक बसवावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत काढला चाकू आणि भोसकले कुणाला, असे प्रकार घडत आहेत. अर्थात शहरात अनेक गुन्हेगार बिनबोभाट शस्त्रे घेऊन फिरत असल्याचे या गुन्ह्यांमधून अधोरेखित होत आहेत. गुन्हेगार जर असे बेदरकारपणे फिरत असेल तर पोलिसांना ते का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केलो जात आहे. वाहतूक शाखेचे पोलीस नुसते सिग्नल तोडणारांकडे नजर लावून असतात. त्यांना आणि गस्त घालणाºया पोलिसांना शस्त्रे घेऊन फिरणारे गुन्हेगार का दिसत नाही, असाही प्रश्न उपराजधीकरांना सतावत आहे.

Web Title: The criminal adoption scheme of Nagpur got bundled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.