गुन्हेगारावर हल्ला, तीन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:28+5:302021-06-10T04:07:28+5:30
नागपूर : हुडकेश्वरमध्ये एका गुन्हेगारावर शस्त्रांनी वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. मंगलदीपनगर निवासी धर्मेंद्र वानखेडे याच्याविरोधात हत्यांसह ...
नागपूर : हुडकेश्वरमध्ये एका गुन्हेगारावर शस्त्रांनी वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. मंगलदीपनगर निवासी धर्मेंद्र वानखेडे याच्याविरोधात हत्यांसह अनेक प्रकरणे दाखल आहेत. मंगळवारी रात्री तो आपल्या दोन मित्रांसह घरी बसला होता. त्यावेळी प्रतीक वाके, आशिष लांजेवार तसेच प्रतीक कहिले तेथे आले. त्यांनी धर्मेंद्रच्या घरावर दगडफेक केली. धर्मेंद्र बाहेर आला तर त्याच्यावर शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. हुडकेश्वर पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्याज व कर्ज परत न केल्यामुळे एका व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्याविरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खडदगाव मार्ग निवासी ५९ वर्षीय वाहनचालक गजानन लोणकर यांनी एटीझेड मोटार रिपेरिंगचे संचालक बोरकर यांच्याकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याज व मुद्दल परत न केल्यामुळे बोरकर हा लोणकर यांना धमकी देत होता. त्याने वाहन व आरसी बुक घेऊन जाण्याची धमकी दिली. धमकीने त्रस्त झालेल्या लोणकर यांनी मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या सुसाइड नोटच्या आधारावरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
झाडाला धडकून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झाडाला दुचाकी धडकल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. श्रीरामनगर, बेसा येथील निवासी राजेश ठाकरे मंगळवारी रात्री १.२० वाजता दुचाकीने घरी जात होते. शताब्दी चौकाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते झाडाला धडकले व जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांनी अपघात प्रकरण दाखल केले.
२० हजार रुपये चोरी झाल्याने आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवण्यात आलेले २० हजार रुपये चोरी झाल्याने धक्का बसल्याने एका तरुणाने जीव दिला. सूरजनगर येथे राहणारा अनंत मुन्ना शुक्ला (२५) हा मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काकांसमवेत फळांचे दुकान चालवत होता. तो दुकानातच झोपायचा. त्याचा भाऊ रोहित काकांसोबत फळ खरेदीसाठी गेला होता. सकाळी सव्वाआठ वाजता रोहित दुकानात पोहोचला. त्याने शटर उघडताच अनंतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. माझ्या गाडीच्या डिक्कीतून २० हजार रुपये चोरी गेले यावर आई विश्वास ठेवणार नाही. मित्रांसोबत राहू नको, असे मला आई नेहमी समजवायची, असे त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूचे प्रकरण नोंदवत चौकशी सुरू केली आहे.