गुप्तधनाच्या शोधासाठी भानामती, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: February 14, 2023 02:47 PM2023-02-14T14:47:51+5:302023-02-14T15:08:05+5:30
हिंगण्यातील प्रकार : गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस
नागपूर : सबकुछ ऑनलाइनच्या युगातदेखील अनेक जण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नको नको ते प्रकार करतात व कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येतात. गुप्तधनाच्या मोहापायी एका शेतात रात्रीच्या अंधारात भानामती व जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगणा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत हा प्रकार घडला असून पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे हिंगणा तालुक्यातील सावंगी देवळी परिसरात खळबळ उडाली आहे.
सावंगी देवळी येथे हर्षल सोनावने यांचे शेत आहे. त्यांच्या शेताजवळच एक हनुमान मंदिर असून त्याला लागूनच त्यांचे परिचित भोयर यांचे शेत आहे. त्या शेतात गुप्तधन असल्याची अफवा होती व ते शोधण्यासाठी काही जण येऊ शकतात अशी कुणकुण सोनावने यांना लागली होती. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांनी गावातील काही सहकाऱ्यांसह फेरफटका मारला असता भोयर यांच्या शेतात त्यांना हलका प्रकाश दिसून आला. सर्व जण प्रकाशाच्या दिशेने गेले असता तेथे चार जण जादूटोण्याचे मंत्रोच्चार करत लिंबू कापून एका विशिष्ट जागेवर फेकत होते. बाजूलाच अडीच फुटांचा खड्डा खोदला होता व त्यात जादूटोण्याचे साहित्य फेकलेले दिसून आले. त्यांना संबंधित प्रकाराबाबत विचारणा केली असता गुप्तधन शोधण्यासाठी भानामती व जादूटोणा करत असल्याची त्यांनी कबुली दिली. त्यात शंकर सावरकर (६७, खापरी मोरेश्वर), विठ्ठल सोमनकर (५२, सावळी), बाबा टेंभुरकर (५७, टाकळघाट), वंदना गडकर (४०, सावळी) यांचा समावेश होता, तर संदीप बहादुरे (४५, टाकळघाट) हा तेथून फरार झाला. गावकऱ्यांनी तत्काळ हिंगणा पोलिस ठाण्याला या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी सोनावने यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
भुताखेतांना बोलावून वाटोळे करण्याची धमकी
आरोपींनी जानेवारी महिन्यात भोयरच्या शेतात येऊन ‘रेकी’ केली होती. त्यावेळी सावरकरची सोनावने यांच्याशी भेट झाली होती व त्याने शेतात गुप्तधन असल्याचे सांगितले होते. त्याने त्यावेळी जादूटोण्याची प्रक्रियादेखील समजावून सांगितली होती. सोनावने यांचा या गोष्टींवर विश्वास नसल्याने त्यांनी आरोपींना तेथून जाण्यास सांगितले होते. यावरून चिडलेल्या सावरकरने मंत्रांच्या साहाय्याने भुताखेतांना बोलावून वाटोळे करेन, अशी धमकी दिली होती.
गावकऱ्यांची सजगता
सोनावने यांनी जानेवारी महिन्यात घडलेला प्रकार गावातील मित्रांना सांगितला होता. त्यानंतर गावातील १५ ते २० जणांनी एकत्रित येऊन चर्चा केली होती व गावाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली होती. घटनेच्या दिवशी गावकऱ्यांनी सजगता दाखविल्यामुळेच अंधश्रद्धेचा हा प्रकार टळला, अशी माहिती सूत्रांनी दिली.