निवडणूक कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:13 PM2019-04-02T23:13:18+5:302019-04-02T23:16:18+5:30
निवडणुकीच्या कामातून वगळण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कारणे सांगू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन संतापले असून निवडणूक कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेशच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. सूत्रानुसार जे कर्मचारी प्रशिक्षणाला दांडी मारतील त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील ४ हजार ३८२ मतदान केंद्रासाठी १९ हजार २७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नकार देणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीच्या कामातून वगळण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कारणे सांगू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन संतापले असून निवडणूक कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेशच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. सूत्रानुसार जे कर्मचारी प्रशिक्षणाला दांडी मारतील त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील ४ हजार ३८२ मतदान केंद्रासाठी १९ हजार २७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नकार देणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिलेत.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ४ हजार ३८२ मतदान केंद्रांवर ११ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी यांची निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रँडमायझेशन पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहेत. त्यामुळे निवड झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत रँडमायझेशन पद्धतीने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रथम अधिकारी, द्वितीय अधिकारी व कर्मचारी अशा पोलिंग पार्टीचे गठन करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती आदेश मिळाले आहेत, त्यांनी संबंधित सहायक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात हजर होऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ४ हजार ८२ पीआरओ, ४ हजार ८२७ एफपीओ तसेच ओपीओमध्ये ४ हजार ८२८ पुरुष तर ४ हजार ७९२ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.