गुन्हे करून गायब होणारा गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:18+5:302021-03-08T04:09:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शोरूममधून कार चोरी केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या दाराला धडक, सरकारी कारला धडक देणारा आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शोरूममधून कार चोरी केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या दाराला धडक, सरकारी कारला धडक देणारा आणि नंतर पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न करून गायब झालेल्या गुंडाला जेरबंद करण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. सुदेश सिद्धार्थ भोयर (३५, रा. प्लॉट नंबर ६,
शताब्दी चौक, अजनी) असे या गुन्हेगाराचे नाव असून, गोंदिया पोलिसांच्या मदतीने अजनी पोलिसांनी त्याच्या शनिवारी रात्री डुग्गीपार (जि. गोंदिया) जवळ मुसक्या आवळल्या.
आरोपी भोयर कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विनयभंगाचे ३, चोरीचे ६ तर घरफोडीचे १२ असे एकूण २१ गुन्हे दाखल आहेत. त्याने ३ मार्चला खामल्यातील एका शोरूममधून भरदिवसा नेक्सा कार चोरली. या कारच्या माध्यमातून त्याने शहरात हैदोस घालणे सुरू केले. ४ मार्चला त्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सरकारी कारला धडक दिली. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने अनेक वाहनांना धडक देत तोडफोड केली. विशेष म्हणजे, आरोपी जादूच्या प्रयोगासारखा गायब झाला. दुसऱ्या दिवशी त्याने महापालिका आयुक्त राधाकृष्ण व्ही यांच्या बंगल्याच्या दारावर कार धडकवली. ते पाहून त्याला अटकाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलीस शिपायावरही त्याने कार चढवण्याचा प्रयत्न केला. ते पाहून पोलीस मागे वळला अन् आरोपी पळून गेला. या घटनेचीही पोलिसांकडे तक्रार झाली. मात्र, पोलीस आरोपीला शोधू शकले नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी १० .३० वाजेच्या सुमारास आरोपी भोयर पुन्हा ही कार घेऊन निघाला अन् त्याने शताब्दी चौकात वाहतूक शाखेचा पोलीस नितीन वरठी यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. नितीन गंभीर जखमी झाने. या घटनेची गंभीर दखल घेत अजनीसह अवघी पोलीस यंत्रणाच तपासकामी लागली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कार कुठे जाऊन थांबली, ते घर पोलिसांनी शोधले. आरोपीचा मोबाइल नंबर मिळवला अन् त्याचे कॉल लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. रात्री हा भामटा गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपारला एका ठिकाणी थांबल्याचे लक्षात येताच अजनी पोलिसांच्या पथकाने गोंदिया पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला पहाटेच्या सुमारास नागपुरात आणण्यात आले. त्याला पोलीस शिपयाला चिरडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
----
पोलिसांच्या हाती यायचे नव्हते
पोलिसांनी कुख्यात भोयरला एकापाठोपाठ गुन्हे करण्याविषयी विचारणा केली असता त्याने आपल्याला पोलिसांच्या हाती यायचे नव्हते म्हणून गुन्ह्यांवर गुन्हे करीत गायब होत होतो, असे निर्ढावलेले उत्तर दिल्याचे समजते. प्राथमिक तपासातच त्याच्यावरचे २१ गुन्हे उघड झाले असून, आणखी काही गुन्हे उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे ठाणेदार विनोद चाैधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
----