दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:56 PM2019-08-03T23:56:07+5:302019-08-03T23:57:39+5:30
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तलवार, चाकूसारखी घातक शस्त्रेही जप्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तलवार, चाकूसारखी घातक शस्त्रेही जप्त करण्यात आली.
अभिषेक मंगेश गिरी (वय १९, रा. स्वामीनगर), अक्षय रामदास राजूरकर (वय १९, रा. तांडापेठ), अभिषेक ऊर्फ भांजा संजय गुलाबे (वय १९, रा. तांडापेठ), विक्की ऊर्फ विवेक रमेश वाघाडे (वय १९, रा. तांडापेठ नवीन वस्ती) आणि विक्की प्रकाश पराते (वय २०, रा. तांडापेठ), अशी आरोपींची नावे आहेत.
पाचपावलीचे पोलीस शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पंचकुआ मातामंदिराच्या मागच्या भागात गस्त करीत होते. त्यांना कोलकाता रेल्वे लाईनलगतच्या ओट्याजवळ काही इसम संशयास्पद हालचाली करताना दिसले. ते पाहून गस्तीवरील पोलिसांनी त्यांना गराडा घातला. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून दोन तलवारी, एक गुप्ती, एक चाकू, नायलॉनची दोरी जप्त केली. ते कोणत्या गुन्ह्याच्या तयारीत होते, कुठे जाणार होते, त्याची चौकशी केली जात आहे. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक एस. एस. सुरोशे, उपनिरीक्षक एम. ए. गोडबोले, एस. एस. बोंडे, हवालदार संतोष ठाकूर, रामेश्वर कोहळे, नायक अरुण बावणे, अभय साखरे आणि शैलेंद्र चौधरी यांनी ही कामगिरी बजावली.
तडीपार गुंडाचाही समावेश
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींपैकी अभिषेक मंगेश गिरी (वय १९, रा. स्वामीनगर, पाचपावली) हा कुख्यात गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याला पोलीस उपायुक्त माकणीकर यांनी एका वर्षासाठी नागपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र तो नागपुरातच राहत असल्याचे आणि गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.