कर्ज चुकविण्यासाठी विद्यार्थी बनले गुन्हेगार : पोलिसांनी उलगडले धक्कादायक वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:19 AM2018-11-16T01:19:28+5:302018-11-16T01:20:12+5:30
मित्राचा हरवलेला कॅमेरा विकत घेऊन देण्यासाठी दोन महाविद्यालयीन विद्यार्थी गुन्हेगार बनले. वेळीच त्यांचे समुपदेशन न झाल्याने ते एकासाठी दुसरा आणि दुसऱ्यासाठी तिसरा गुन्हा करीत गेले. गुन्हे शाखेकडून पकडण्यात आलेल्या वैभव विनोद हर्षे (वय १९, रा. शांतिनगर) आणि अक्षय लीलाधर वंजारी (वय १९, रा. कळमना) या दोघांच्या अटकेनंतर उजेडात आलेला घटनाक्रम चिंतनाचा विषय ठरला आहे. पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती देताना गरीब मात्र चांगली मुलं गुन्ह्यात अडकल्याबद्दल खेदही व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्राचा हरवलेला कॅमेरा विकत घेऊन देण्यासाठी दोन महाविद्यालयीन विद्यार्थी गुन्हेगार बनले. वेळीच त्यांचे समुपदेशन न झाल्याने ते एकासाठी दुसरा आणि दुसऱ्यासाठी तिसरा गुन्हा करीत गेले. गुन्हे शाखेकडून पकडण्यात आलेल्या वैभव विनोद हर्षे (वय १९, रा. शांतिनगर) आणि अक्षय लीलाधर वंजारी (वय १९, रा. कळमना) या दोघांच्या अटकेनंतर उजेडात आलेला घटनाक्रम चिंतनाचा विषय ठरला आहे. पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती देताना गरीब मात्र चांगली मुलं गुन्ह्यात अडकल्याबद्दल खेदही व्यक्त केला.
वैभव हा बीसीसीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून, त्याला वडील नाही. आई धुणी भांडी करून कुटुंबाचा गाडा रेटते. तर अक्षय १२ वीत शिकतो. त्याच्या घरची स्थितीही हलाखीची आहे. काही दिवसांपूर्वी फोटो काढून घेण्यासाठी वैभवने त्याच्या एका सधन मित्राचा कॅमेरा सोबत नेला. एका ठिकाणी तो कॅमेरा चोरीला गेला अन् वैभवच्या भविष्याला वेगळेच वळण मिळाले. कॅमेरा ८० हजारांचा होता. एवढी मोठी रक्कम कशी चुकवायची, असा प्रश्न वैभवला पडला. तो कॅमेराच्या किमतीची शहानिशा करण्यासाठी मोबाईल अॅपवर (ओएलएक्स) शोध घेऊ लागला. अॅपवर त्याला नागपुरातील अनेकांकडून ३०० रुपये रोज भाड्याने कॅमेरा दिला जात असल्याचे दिसले. त्याने त्यातील एकाला फोन करून आठ दिवसांसाठी कॅमेरा भाड्याने मागितला. तो घेतल्यानंतर त्याने गहाण ठेवला. त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने पुन्हा दुसऱ्याकडून कॅमेरा भाड्याने घेतला. नंतर तिसरा, चौथा असे अनेक कॅमेरे भाड्याने घेतले आणि ते गहाण ठेवून त्यातून आलेल्या पैशातून मित्राच्या कॅमे-याची किंमत चुकवली. दरम्यान, ज्यांच्याकडून भाड्याने कॅमेरा आणला, त्यांचा परत मागण्यासाठी तगादा सुरू होताच तो दुसऱ्याकडून भाड्याने कॅमेरा घेऊन तो गहाण ठेवायचा आणि त्यातून आलेल्या रकमेतून तगादा लावणाऱ्याचा कॅमेरा परत करायचा. वैभवने या बनवाबनवीत अक्षयलाही सहभागी करून घेतले आणि या दोघांनी एकूण १७ कॅमेरे भाड्याने घेऊन ते गहाण ठेवले. दरम्यान, आॅक्टोबरमध्ये वैभवने पीयूष नरेश शाहू (वय २०, रा. परदेशीपुरा, गणेशपेठ) यांच्याकडून्ही असाच एक कॅमेरा भाड्याने घेतला होता.
मुदत संपल्यावर वारंवार फोन करूनही वैभव भाड्याने नेलेला कॅमेरा परत करण्याचे नाव घेत नसल्याने शाहू त्याच्या घरी पोहचला. यावेळी त्याला तेथे आणखी काही जण कॅमेरा मागण्यासाठी आल्याचे दिसले. त्यानंतर वैभवने फसवणूक केल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैभवचा शोध घेणे सुरू केले. या गुन्ह्याची माहिती कळाल्याने गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथकही शोधकामी लागले. त्यांनी बुधवारी वैभवला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून अक्षयलाही ताब्यात घेतले. त्या दोघांनी गहाण ठेवलेले ८ लाख, ४० हजार रुपये किंमतीचे एकूण १७ कॅमेरे जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, उपनिरीक्षक मंगला मोकासे, हवालदार शत्रुघ्न कडू, अनिल दुबे, अरुण धर्मे, श्याम कडू, मिलिंद नासने, आरिफ शेख आणि हरीश बावणे यांनी बजावली.
दोघांचे भविष्य अडचणीत
वैभव आणि अक्षयची चौकशी केल्यानंतर पोलीसही थक्क झाले. त्यांनी यापूर्वी कोणताही गुन्हा केला नाही. त्यांची वृत्तीही गुन्हेगारांसारखी नाही. मित्रांकडून आणलेला कॅमेरा चोरीला गेल्याने झालेली चूक कशी सुधारावी, या विचाराने वैभव अस्वस्थ झाला अन् त्याच्या हातून एकामागोमाग एक चुका घडल्या. त्यांना अटक केल्यानंतर त्यांची शैक्षणिक आणि त्यांच्या घरची एकूणच स्थिती लक्षात घेता गुन्हेगारीचा ठपका लागल्याने या दोघांचे भविष्य अडचणीत आले आहे. त्यांना त्यातून कसे बाहेर काढायचे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बालगुन्हेगारांना वळणावर आणण्यासाठी एक चांगला उपक्रम सुरू केला आहे. वैभव आणि अक्षयचे भविष्य खराब होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांनी काही तरी करावे, अशी अपेक्षा पत्रकार परिषदेतनंतर पोलीस आयुक्तालयात सुरू झालेल्या चर्चेतून व्यक्त करण्यात आली आहे.