उपराजधानीत विविध प्रांतांतील गुन्हेगारांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:36 AM2020-03-18T10:36:53+5:302020-03-18T10:38:48+5:30

नागपुरात अलीकडे विविध प्रांतांतील कुख्यात गुन्हेगार डेरेदाखल होऊन गुन्हे करीत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Criminals of different provinces in sub-continent | उपराजधानीत विविध प्रांतांतील गुन्हेगारांचा ठिय्या

उपराजधानीत विविध प्रांतांतील गुन्हेगारांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देमुक्कामी राहून करतात गुन्हे महिनाभरात तीन टोळ्या जेरबंद

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे हृदयस्थळ असलेले नागपूर शहर अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले आहे. देश-विदेशात कोणत्याही ठिकाणावर जाण्यासाठी येथून पाण्यातील जहाज वगळता दळणवळणाची विविध साधनं उपलब्ध आहेत. रोजगाराचीही संधी चांगली आहे. त्यामुळे विविध प्रांतांतील मंडळी नागपूरकडे धाव घेताना दिसते. मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील कष्टकरी मंडळींचे लोंढे नेहमीच नागपुरात यायचे. नंतर ओडिशा, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधील मंडळीही रोजगारासाठी येऊ लागली. त्यांच्यापाठोपाठ ओडिशा, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि आंध्रातील गांजा तस्करांच्या येरझारा वाढल्या. अलीकडच्या काही वर्षांत एमडी हा सर्वात महागडा अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्या नागपूरला खेपा वाढल्या आहेत. हे कमी की काय म्हणून नागपुरात अलीकडे विविध प्रांतांतील कुख्यात गुन्हेगार डेरेदाखल होऊन गुन्हे करीत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
प्रारंभी येथे फसवणूक करणाऱ्या दाक्षिणात्य अण्णा टोळींचे वास्तव्य राहायचे. विशिष्ट दिवस मुक्कामी राहून ही टोळी गुन्हे करायची अन् येथून पळून जायची. आता मात्र मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार नागपुरात राहून, येथे आपली टोळी बोलवून गुन्हे करीत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिनाभरात गुन्हे शाखेने अशाच प्रकारे नागपुरात राहून गुन्हे करणाऱ्या आणि लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या मध्य प्रदेशातील सिसोदिया टोळीचा छडा लावला. त्यातील तीन गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांसह ५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तामिळनाडूतील चेन्नईचा मुरली परशुरामन हा कुख्यात गुन्हेगार नागपुरात तीन वर्षांपासून मुक्कामी होता. तो ऑटो चालवून शहरात फिरायचा. संधी मिळताच दुचाकी चोरायचा अन् चेनस्नॅचिंगचे गुन्हे करायचा. अलीकडे त्याने वेल्लोर (चेन्नई) येथील आपल्या साथीदारांना नागपुरात बोलवून महिलांचे दागिने लुटण्याचा सपाटा लावला होता.

Web Title: Criminals of different provinces in sub-continent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.