सीसीटीव्हीमुळे सापडला गुन्हेगार

By admin | Published: July 24, 2016 02:21 AM2016-07-24T02:21:56+5:302016-07-24T02:21:56+5:30

इमामवाडा येथील कराटे खेळाडू असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पकडण्यास मेडिकल चौकातील सीसीटीव्ही फुटेजची मदत मिळाली.

Criminals found by CCTV | सीसीटीव्हीमुळे सापडला गुन्हेगार

सीसीटीव्हीमुळे सापडला गुन्हेगार

Next

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण : २४ तासात जाळ्यात
नागपूर : इमामवाडा येथील कराटे खेळाडू असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पकडण्यास मेडिकल चौकातील सीसीटीव्ही फुटेजची मदत मिळाली. या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर गुन्हे शाखा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास २४ तासात अटक केली.
पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत यासंबंधात सविस्तर माहिती दिली. नितीन अनिल जयस्वाल ऊर्फ सोनू गुप्ता (२५) रा. रामबाग कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. तो इलेक्ट्रीशियनचे काम करतो. आरोपी सोनू मूळचा वर्धा येथील राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध छेडखानीचे यापूर्वी सुद्धा दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीसोबत पीडित मुलीला जाताना पाहणारे साक्षीदारसुद्धा पोलिसांना सापडले. परंतु स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आल्यासंदर्भातील प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी देण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य आणि नागरिकांमध्ये असलेला असंतोष पाहता आरोपी तातडीने पकडले जाणे पोलिसांसाठी आवश्यक होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. आरोपीविरुद्ध पोलिसांनी सबळ पुरावे जमा केले आहेत.
आता हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासंदर्भात शिफारस केली जाईल, असेही सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अपर पोलीस आयुक्त सुहास वारके, गुन्हे शाखेचे प्रभारी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा उपस्थित होते.(प्रतिनिधी)

मिशी कापली, मोबाईलही केला बंद
सराईत आरोपी असलेल्या सोनू गुप्ताने घटनेनंतर त्याच्या जवळच्या मोबाईलचे सीमकार्ड आणि बॅटरीसुद्धा काढून ठेवली होती. यानंतर तो वस्तीतून फरार झाला होता. इतकेच नव्हे तर ओळखले जाऊ नये म्हणून त्याने मिशीसुद्धा काढून घेतली होती.
काय आहे प्रकरण
आरोपी सोनू हा पीडित मुलीच्या वस्तीतच राहतो. त्यामुळे तो पीडित मुलगी व तिच्या बहिणीला ओळखत होता. त्याला पीडित मुलीच्या येण्या-जाण्याची वेळ व रस्ता माहीत होता. त्यामुळे आरोपी सोनूने २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मुलीला मेडिकल चौकात थांबवून तिच्याशी चर्चा केली. तिला सांगितले की, तिच्या बहिणीचे एका मुलाशी प्रेमसंबंध आहे. दोघेही मेडिकलच्या टीबी वॉर्डातील एका जुन्या क्वॉर्टर परिसरात भेटतात. तिला ती जागा दाखविण्यासाठी सोबत चलण्यास सांगितले. परंतु तेव्हा ती मुलगी घरी निघून गेली. काही वेळानंतर ती कराटे क्लाससाठी बाहेर पडली. सायंकाळी ७.३० वाजता परत येताना आरोपी सोनूने तिला पुन्हा थांबविले आणि टीबी वॉर्डातील ती जागा दाखविण्यासाठी सोबत घेऊन गेला. हा सर्व घटनाक्रम मेडिकल चौकातील काही दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला.

Web Title: Criminals found by CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.