गुन्हेगारांचे मित्र गुन्हेशाखेत
By admin | Published: April 17, 2015 02:14 AM2015-04-17T02:14:47+5:302015-04-17T02:14:47+5:30
गुन्हेगारांचे मित्र म्हणून पोलीस दलात ओळख असलेल्या आणि अनेकदा कारवाई झालेल्या काही वादग्रस्त पोलीस
नागपूर : गुन्हेगारांचे मित्र म्हणून पोलीस दलात ओळख असलेल्या आणि अनेकदा कारवाई झालेल्या काही वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची गुन्हेशाखेत बदली झाल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांनी तगडी ‘लॉबिंग‘ करून गुन्हेशाखेत वर्णी लावून घेतल्याचीही जोरदार चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
बुधवारी रात्री काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यातील चौघांना गुन्हेशाखेत नियुक्त करण्यात आले. त्यातच वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा कर्मचारी तर धंतोली, अजनी, जरीपटकासह उपराजधानीतील अनेक भागांमधील कुख्यात गुन्हेगारांचा मित्र म्हणून सर्वत्र ओळखला जातो. गुन्हेगारांच्या टोळीसोबत त्याचे नुसते संबंधच नाही तर क्लबसह काही अवैध धंद्यातही त्याचा सहभाग असल्याची चर्चा आहे. तो आपल्या खास गुन्हेगार मित्रांकडून ‘कामे‘ करवून घेतो. चार वर्षांपूर्वी गुन्हेशाखेत असताना याने एका गुन्हेगाराला पकडले होते. त्याच्याकडून ५० हजार रुपये घेऊन त्याला परस्पर सोडून दिले. त्यानंतर त्याच गुन्हेगाराला गुन्हेशाखेच्या दुसऱ्या पथकाने पकडले. तेव्हा हा प्रकार उजेडात आला. गुन्हेशाखेचे तत्कालीन अप्पर आयुक्त रवींद्र सिंघल यांनी त्याला तडकाफडकी निलंबित केले होते.त्यानंतर अजनी ठाण्यात त्याच्यावर हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या पथकाने दीड महिन्यांपूर्वी जरीपटक्यातील एका जुगार अड्ड्यावर छापा घातला. त्यावेळी या अड्ड्यात त्याची भागीदारी असल्याचेही उघड झाले होते. एवढेच नव्हे तर सीताबर्डीतील मोबाईल व्यापारी भरत खटवानीच्या हत्येतील आरोपींची नाट्यमय शरणागतीही याच पोलीसाच्या मध्यस्थीने झाली होती. अशी वादग्रस्त पार्श्वभूमी असताना या कर्मचाऱ्याला गुन्हेशाखेत कशी नियुक्ती मिळाली, असा प्रश्न खुद्द गुन्हेशाखेसह शहर पोलीस दलात चर्चेला आला आहे.(प्रतिनिधी)
कुणाची लॉबिंग ?
गुन्हेशाखा पोलीस दलाचा कणा मानला जातो. यात चांगल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती अपेक्षित असते. मात्र, पोलीस दलातील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कर्मचाऱ्याचे कर्तृत्व माहीत असून देखील त्याची नियुक्ती गुन्हेशाखेत झाल्याने सारेच चक्रावले आहे. या कर्मचाऱ्यांनी गुन्हेशाखेत नियुक्तीसाठी कुणाकडून लॉबिंग करवून घेतले, असा प्रश्न विचारला जात आहे. शुक्रवारी हे नियुक्ती प्रकरण तापण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
ट्रॅफिकही प्रभावित : बदली झालेले काही कर्मचारी वाहतूक शाखेतही नियुक्त करण्यात आले. यात लाच प्रकरणात अडकलेल्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी या कर्मचाऱ्याला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले होते तो पीसीआरमध्ये राहिला नंतर त्याला निलंबित करण्यात आले. आता त्याला वाहतूक शाखेत नियुक्त करून ‘नो झंजट, ओन्ली इनकमिंग‘ची जागा देण्यात आल्यामुळे वाहतूक शाखाही प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे.