मारहाण करणाऱ्या गोरक्षकांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:58 AM2017-07-18T01:58:33+5:302017-07-18T01:58:33+5:30
भारसिंगी येथील गोवंश मांस प्रकरणात सलीम ईस्माईल शहा यास मारहाणप्रकरणी अटकेतील चार आरोपींना नरखेड येथील न्यायालयात सोमवारी हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.
सलीम शहाला जामीन मंजूर : भारसिंगी येथील गोवंश मांस प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : भारसिंगी येथील गोवंश मांस प्रकरणात सलीम ईस्माईल शहा यास मारहाणप्रकरणी अटकेतील चार आरोपींना नरखेड येथील न्यायालयात सोमवारी हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चौघांचीही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. तसेच गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सलीम शहाला न्यायालयाने जामीन मंजूर केला.
सलीम ईस्माईल शहा (३२, रा. हत्तीखाना, काटोल) याच्याकडे गोवंश मांस आढळून आल्याने कथित गोरक्षकांनी त्याला जबर मारहाण केली होती. ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भारसिंगी येथे बुधवारी (दि. १२) सकाळी घडली होती. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी मोरेश्वर तांदूळकर (३०, रा. भारसिंगी, ता. नरखेड), जगदीश चौधरी (२८, रा. मदना, ता. नरखेड), अश्विन उईके (२६, रा. नारसिंगी, ता. नरखेड) व रामेश्वर तायवाडे (२७, रा. जामगाव, ता. नरखेड) या चौघांना अटक केली होती. त्यांना गुरुवारी काटोल येथील न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयाने या चारही आरोपींना सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांना सोमवारी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नरेंद्र पुरी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद ऐकून घेत चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चौघांचीही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
दुसरीकडे, गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी सलीम शहा यास शनिवारी मध्यरात्री अटक केली. त्याला रविवारी नरखेड येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यालाही सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नरेंद्र पुरी यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयात पोलिसांच्यावतीने अॅड. जी. बी. राऊत यांनी तर सलीमच्यावतीने अॅड. संजय क्षीरसागर यांनी बाजू मांडली.
सलीमला भारसिंगीत मज्जाव
सलीम शहा याने भारसिंगी येथे जाऊ नये तसेच त्याने कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगू नये, या अटींवर नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नरेंद्र पुरी यांच्या न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. सलीमला जामीन मंजूर होऊनही परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेत पोलिसांनी त्याला काही काळ ताब्यात ठेवले होते. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्याला त्याच्या घरी सोडले. आरोपींना न्यायालयात आणतेवेळी तसेच नेतेवेळी पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.पोलीस उपअधीक्षक (गृह) गावंडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे न्यायालयात हजर होते. या घटनेच्या माहितीबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली होती.