नागपुरात हायटेक पोलिसांवर गुन्हेगारांची कुरघोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:48 AM2018-09-03T10:48:45+5:302018-09-03T10:51:23+5:30
उपराजधानीतील गुन्हेगार हायटेक पोलिसांवर कुरघोडी करीत आहेत. गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस वेगवेगळे अॅक्शन प्लॅन बनवीत आहेत तर कल्पनेच्या पलीकडे जाऊन गुन्हेगार पोलिसांच्या प्लॅनला क्रॅक डाऊन करीत आहेत.
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगार हायटेक पोलिसांवर कुरघोडी करीत आहेत. गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस वेगवेगळे अॅक्शन प्लॅन बनवीत आहेत तर कल्पनेच्या पलीकडे जाऊन गुन्हेगार पोलिसांच्या प्लॅनला क्रॅक डाऊन करीत आहेत. त्यासाठी हे गुन्हेगार संकेत स्थळाचा(वेबसाईट)ही वापर करीत आहेत. अजनीत घडलेल्या प्रतीक ढेंगरेच्या हत्याकांडातून ही चक्रावून टाकणारी माहिती पुढे आली आहे.
गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. सीसीटीएनएसच्या माध्यमातून कुठल्याही गुन्हेगाराची माहिती एका क्लिकवर कळते, असा दावा मध्यंतरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता. पोलीस हायटेक झाल्याचे नेहमीच सांगितले जाते. शहरातील गुन्हेगारांना हुडकण्यासाठी, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठीही नागपूर पोलिसांनी वेगवेगळ्या वेबसाईट बनविल्या आहेत. गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठीही पोलीस त्याचा वेळोवेळी वापर करतात. दुसरीकडे हायटेक पोलिसांसोबत उपराजधानीतील गुन्हेगार शह-मातचा खेळ खेळत आहेत. नव्हे, कुरघोडीही करीत आहेत. त्यांनी आता गुन्हे करण्यासाठी शस्त्रांची खेपही कुरियरने मागविणे सुरू केले आहे. त्यासाठी ते वेबसाईटचा वापर करीत आहेत. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ आॅगस्टला भरदुपारी प्रतीक संजय ढेंगरे (वय १९) याची पवन ऊर्फ आलू भोसले (वय २४, रा. वसंतनगर), स्नेहांशू बोरकर (वय २२, रा. भगवाननगर) आणि निहाल शंभरकर (वय २३, रा. कुकडे लेआऊट) या तीन कुख्यात गुंडांनी निर्घृण हत्या केली. त्यातूनच ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
आरोपी आलू भोसले आणि निहाल शंभरकर हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. तर, स्नेहांशू बोरकर हा या दोघांच्या संगतीला लागेपर्यंत अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून परिसरात ओळखला जात होता. त्याला १० वीत ९२ टक्के गुण मिळाले असून, तो चांगला जलतरणपटू आहे. त्याने स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये पुरस्कार मिळवला आहे. गेल्या वर्षीपर्यंत अभियंता बनण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या बोरकरने कुख्यात आलू भोसले आणि निहाल शंभरकरच्या संगतीत आल्यानंतर चांगले गुण सोडून वाईट गुण स्वीकारले. त्याने आपली हुशारी गुन्हेगारीत वापरणे सुरू केले. प्रतीक ढेंगरेच्या हत्येचा कट बोरकर, भोसले आणि शंभरकर या तिघांनी तीन आठवड्यांपूर्वीच रचला होता. हत्या केल्यानंतर कुठे पळून जायचे, त्याचाही प्लॅन त्यांनी आधीच तयार केला होता.
फ्लिपकार्टवर चाकूची आॅर्डर
प्रतीकला मारण्यासाठी त्यांनी फ्लिपकार्ट या वेबसाईटवरून तीक्ष्ण चाकू मागवून घेतला होता. बोरकरने थ्रीडी १००४ कोड असलेला अत्यंत धारदार चाकूची आॅर्डर १३ आॅगस्ट २०१८ ला फ्लिपकार्टवर नोंदवली. दोन्हीकडून फोल्ड होणाऱ्या या चाकूमध्ये की फिचर असून त्याचा कसाही वापर केला जाऊ शकतो. २८ आॅगस्टला दुपारी २२४ रुपये देऊन बोरकरने घातक चाकूची डिलिव्हरी कुरियरच्या माध्यमातून घेतली होती. चाकू मिळविल्यानंतर ते प्रतीकचा गेम करण्याची संधी शोधू लागले. ३१ आॅगस्टला दुपारी तो सम्राट अशोक गार्डनमध्ये प्रतीक असल्याचे कळताच हे तिघे तेथे आले आणि त्यांनी त्याची हत्या करून त्याचा मृतदेह दुचाकीवर मेडिकलच्या आवारात नेऊन सोडला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे कुख्यात आलू भोसले दुसरीकडे तर बोरकर आणि शंभरकर हे दोघे चंद्रपूरला नातेवाईकांकडे पळून गेले. तेथे नातेवाईकांनी त्यांना फटकारल्याने ते वर्धेतील आत्याकडे पोहचले आणि शनिवारी रात्री पोलिसांच्या हाती लागले. त्यातून नागपुरातील गुन्हेगार शस्त्रे विकत घेण्यासाठी वेबसाईटचा वापर करीत असल्याचे उघड झाले आहे. या थरारक हत्याकांडानंतर उघड झालेल्या धक्कादायक घटनाक्रमाने हायटेक पोलीस यंत्रणा चक्रावली आहे. गुन्हेगार एवढे कसे पुढे गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशेष म्हणजे, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ आॅगस्टला कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात दरोडा घालून ४ लाख ७३ हजार रुपये लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांपैकी एक आरोपी फैजान हा एकही वर्ग शिकलेला नाही. मात्र, गुन्हेगारीतच नव्हे तर पोलिसांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी तो असे काही डोके वापरतो की एखादा उच्चशिक्षितही मागे पडावा.
अन्य दरोडेखोर जेमतेम शिक्षण घेतलेले आहेत. मात्र. त्या सर्वांनी दरोडा घालताना स्वत:चे तोंड सीसीटीव्हीत येऊ नये याची खास काळजी घेतली होती. तीन आठवड्यांपूर्वी लकडगंज परिसरात एक वेल्डर पकडला गेला. अर्धवट शिक्षण घेतलेल्या या वेल्डरने आपल्या ‘अचाट बुद्धिमत्तेचा’ वापर चक्क एटीएम फोडण्यासाठी केला होता. त्याने तीन एटीएम कापले. तत्पूर्वी आपली ओळख लपविण्यासाठी तो एटीएमच्या कॅमेऱ्यावर स्प्रे मारत होता. अशीच अनेक उदाहरणे आहेत. त्यातून गुन्हेगार हायटेक पोलिसांवर मात करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे उघड होत आहे.