गुन्हेगारांची माहिती तात्काळ मिळणार
By admin | Published: September 15, 2015 06:21 AM2015-09-15T06:21:37+5:302015-09-15T06:21:37+5:30
गुन्हेगारांची माहिती तक्रारकर्त्यांना इंटरनेटवर पाहण्याची आणि प्रत्येक पोलीस ठाणेदारांना आवश्यकतेनुसार संबंधित
नागपूर : गुन्हेगारांची माहिती तक्रारकर्त्यांना इंटरनेटवर पाहण्याची आणि प्रत्येक पोलीस ठाणेदारांना आवश्यकतेनुसार संबंधित गुन्ह्याची माहिती होण्यासाठी सीसीटीएनएस अर्थात ‘क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अॅण्ड सिस्टिम्स् ’ ही नवी अत्याधुनिक प्रणाली पोलीस विभागाने विकसित केली आहे. या प्रणालीचा लोकार्पण सोहळा १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
पर्सिस्टंट सिस्टिम्स् आॅडिटोरियम आयटी पार्क नागपूर येथे हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रजेश सिंह हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या हेतूने ही नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. एखाद्या गुन्ह्याच्यासंबंधी तक्रारकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर त्या गुन्ह्याची अद्ययावत माहिती रोजच्या रोज संबंधित तक्रारकर्त्याला इंटरनेटवर या प्रणालीद्वारे मिळू शकेल. त्या तक्रारकर्त्याला ‘एफआयआर’च्या प्रतीबरोबर या संबंधीचा युजर अॅण्ड पासवर्ड दिला जाईल. म्हणजे पोलिसांकडून होत असलेली तपासाबाबतची प्रगती त्याला इंटरनेटवर मिळू शकेल. त्याशिवाय एखादा गुन्हेगार दुसऱ्या जिल्ह्यात सापडला असेल तर संबंधित ठाणेदाराला त्या गुन्हेगारांची माहिती तातडीने इंटरनेटवर मिळू शकेल. प्रत्येक ठाणेदाराला युजर अॅण्ड पासवर्ड देण्यात येईल. या नव्या प्रणालीचा उपयोग राज्यातील १ हजार ५० पोलीस ठाण्याला होईल.
याप्रसंगी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, महापौर प्रवीण दटके, खासदार विजय दर्डा, खासदार अविनाश पांडे, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने,आ. राजेंद्र मुळक, आ. नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, आ. सुनील केदार, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधीर पारवे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. समीर मेघे, आ. सुधाकर कोहळे, आ. आशिष देशमुख, आ. मल्लिकार्जुन रेड्डी उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)