नागपुरात कचरा संकलनावर संकटाचे सावट ! कनकचा करार १५ ला संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:24 AM2019-02-06T00:24:07+5:302019-02-06T00:26:23+5:30
स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महापालिका यांच्यातील करार १५ फे ब्रुवारीला संपत आहे. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणारी यंत्रणा संकटात असल्याचे दिसत आहे. पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिका वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु यात यश मिळालेले नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कनकला महिनाभर काम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महापालिका यांच्यातील करार १५ फे ब्रुवारीला संपत आहे. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणारी यंत्रणा संकटात असल्याचे दिसत आहे. पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिका वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु यात यश मिळालेले नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कनकला महिनाभर काम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार शहाराचे क्षेत्रफळ वाढण्यासोबतच लोकसंख्या वाढली आहे. याचा विचार करता कचरा संकलनासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे. परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कनकचे काम समाधानकारक नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात नाही. यामुळे स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका माघारण्याची शक्यता आहे.
२००८ मध्ये कनक रिसोर्सेसला दहा वर्षासाठी घराघरातून कचरा संकलित करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. दहा वर्षांसाठी करार करण्यात आला होता. त्यानंतरही यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने कचरा संकलन संकटात येण्याची शक्यता आहे. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. प्रति मेट्रिक टन १३०६ रुपये दराने कनकला मोबदला दिला जातो. अधिक बिल दिल्याने महापालिकेने कनकच्या बिलातून कपात केली आहे.
कनकच्या सूत्रानुसार महापालिका प्रशासनाने घराघरातून कचरा संकलन करण्याला एक महिना मुदतवाढ दिली आहे. तूर्त कंपनीने आपला निर्णय दिलेला नाही. या संदर्भात आयुक्तांसोबत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.
नवीन फॉर्म्युल्यावर निर्णय नाही
घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘रिक्वेस्ट टू प्रपोजल’(आरएफपी)तयार करून ते मुंबई बेस्ट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडे पाठविण्यात आले आहे. तेच आरएफपीची सक्षमता व अन्य बाजूंचा विचार करून याचे मायक्रो नियोजन करणार आहे. परंतु निर्णय होऊ शकला नाही. शहरातील लोकसंख्या वाढल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन करण्यात महापालिका कमी पडली आहे. यामुळे दोन ऑपरेटरची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे.
कचरा संकलनाच्या खर्चात वाढ
लोकसंख्या वाढीसोबतच शहरातील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दरवर्षी कचरा संकलनावरील खर्चात वाढ होत आहे. घराघरातून कचरा संकलनाच्या मोबदल्यात महापालिकेने वर्ष २०१५-१६ मध्ये ४० कोटी, वर्ष २०१६-१७ मध्ये ४४.२४ कोटी, वर्ष २०१७-१८ मध्ये ५७.९५ कोटी व वर्ष २०१८-१९मध्ये जानेवारीपर्यंत ४४.६४ कोटी खर्च केले आहे.