बोंडअळीचे संकट विदर्भातील शेतकऱ्यांच्या दारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:24 AM2018-07-25T11:24:40+5:302018-07-25T11:27:18+5:30
शेतात पेरणी झाल्यापासून ५० ते ६० दिवसानंतर देखील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट येण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिनिंग मिल्समध्ये लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्यात गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहेत. शेतात पेरणी झाल्यापासून ५० ते ६० दिवसानंतर देखील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडीचा कपाशीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच सतर्कता बाळगावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे.
नागपूर विभागात खरीप हंगामात ११.६६ लक्ष हेक्टरवर विविध पिकांची प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे. आतापर्यंत विभागात सरासरी ६१ टक्के पेरणी झाली असून वर्धा जिल्ह्यात ८७ टक्के, नागपूर ७६, चंद्रपूर ६५, गडचिरोली ३०, गोंदिया २३ तसेच भंडारा जिल्ह्यात २२ टक्के पेरणी झालेली आहे. खरीप हंगामादरम्यान नागपूर विभागात ६.१८ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. गेल्यावेळी गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते. कीड व्यवस्थापनाचा खर्च वाढून उत्पन्नात मोठी घट झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही तशीच चिन्हे आहेत. शेतात पेरणी झाल्यापासून ५० ते ६० दिवसानंतर देखील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कपाशीच्या पाते, कळ्या, फुलांवर हे कीटक उपजीविका करतात. याशिवाय अळी बोंडातील बिया खाल्लाने रुईची प्रत तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण देखील कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या किडीचा प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेत लक्षात येणे कठीण असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
फवारणी करताना काळजी घ्या
कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकऱ्यांनी संरक्षक कपडे, बूट, मोजे, मास्क इत्यादी वापरावे. हवेच्या दिशेने फवारणी करावी व फवारणी शक्यतोवर सकाळ किंवा संध्याकाळ या वेळेत करावी. कीटकनाशकाचा शरीराशी थेट संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी, चुकून संपर्क झाल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे. फवारणी द्रावण बनविताना परिसरात खाण्याचे पदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेवू नये. फवारणीच्या वेळी खाद्यपदार्थ, बिडी, तंबाखूचे सेवन टाळावे, फवारणीनंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.