‘म्युकर’नंतर आता ‘बोन डेथ’चे संकट; आठ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 10:36 AM2021-07-21T10:36:55+5:302021-07-21T10:37:21+5:30
Nagpur News कोरोनामुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी झाले असताना ‘बोन डेथ’ (अवॅस्क्युलर नेक्रोसिस) या आजाराने डोके वर काढल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी झाले असताना ‘बोन डेथ’ (अवॅस्क्युलर नेक्रोसिस) या आजाराने डोके वर काढल्याने चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सध्या दिसून येणारे रुग्ण कोरोनाचा पहिल्या लाटेतील आहेत. दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या पाहता रुग्ण वाढण्याची भीती आहे. मेडिकलमध्ये सध्या आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनावर मात केलेले अनेक रुग्ण सध्या ‘लाँग कोविड’च्या लक्षणांनी त्रस्त आहेत. यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या अधिक आहे. आता या रुग्णांची संख्या कमी झाली असताना ‘बोन डेथ’ या नवीन आजाराने डोके वर काढले आहे. मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचा ‘जॉईंट रिप्लेसमेंट’ या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा पहिल्या लाटेदरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये हा आजार दिसून आला आहे. यामुळे पुढील सहा महिन्यानंतर या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे ‘बोन डेथ’?
मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. मो. फैजल यांनी सांगितले, ‘अवॅस्क्युलर नेक्रोसिस’ या आजारात हाडांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गाठ निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो. परिणामी, त्या ठिकाणच्या पेशी मृत होतात. अनेकदा हाडांना तडे जातात. यामुळे हाडे तुटण्याचा धोका निर्माण होतो.
‘स्टेरॉइड’ ठरतेय कारण
कोरोनाचा गंभीर रुग्णांवर ‘स्टेरॉइड’ उपचाराचा समावेश केला जातो. लांब कालावधीपर्यंत दिल्या जाणाऱ्या या उपचारामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. या शिवाय, हार्मोनचे प्रमाण वाढून रोगप्रतिकार शक्ती कमी होते. बोन टिश्शूची निर्मिती होण्यासच अडथळा निर्माण होतो.