पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:46 PM2019-07-12T23:46:11+5:302019-07-12T23:56:24+5:30
जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे अजूनही ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे अजूनही ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.
गेल्या १५ दिवसात जिल्ह्यातील सुमारे ५२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात कापूस प्रथम व सोयाबीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत झालेल्या पेरणीतील सुमारे ६५ टक्के क्षेत्र हे कापसाने व्यापले आहे. तर पावसामुळे अद्यापही भात पिकाच्या रोवणीला सुरुवात झाली नाही. जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५ लाख ७ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. त्यातील ४ लाख ७९ हजार २१० हेक्टर क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे आहे. कापसाचे एकूण नियोजित क्षेत्र हे २ लाख २५ हजार हेक्टर आहे. सोयाबीनचे १ लाख हेक्टर व भात पिकाचे ९४ हजार २०० हेक्टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे भाकित वर्तविले होते. परंतु, हवामान खात्याचा हा अंदाज चुकला. पावसाचे आगमन यंदाही उशिराच झाले. गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी यंदा सावध भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घ्यावा आणि पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्या अनुषंगे ४८ टक्के क्षेत्रावर अद्यापही पेरण्या झालेल्या नाहीत. भात पिकासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने भाताच्या पेरण्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे.
जुलै महिना पावसाचा असतो. परंतु, अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून विदर्भात तुलनेने फारच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता लागली आहे. तरीसुद्धा आजवर म्हणजेच ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: २९६.४ मिलिमीटर इतका पाऊस पडत असतो. मात्र, यंदा १ जून ते ११ जुलैपर्यंत केवळ २२५ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्याने कमी आहे.
आजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ५२.१७ टक्के म्हणजेच २ लाख ५० हजार ०२० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात कापसाची १ लाख ६४ हजार १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची ४८ हजार ८२७ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तुरीची ३३ हजार २३७ हेक्टरवर तर ज्वारीची १३०६.६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत धानाने एकूण २५२४.६३ हेक्टर तर डाळींनी ३३ हजार ७४४ हेक्टर इतके क्षेत्र व्यापले आहे.
अद्यापतरी संकट नाही
जून महिन्याच्या शेवटीशेवटी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. पण आणखी १० दिवस पावसाला उशीर झाल्यास नक्कीच फटका बसू शकतो. मुळात मान्सूनला उशीर झाल्याने यावर्षी पेरण्या उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे टक्केवारी कमी आहे. त्यात भात पिकांसाठी अपेक्षित पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधिकारी
दुबार पेरणीचे संकट आहेच
हवामान खात्याचे अंदाज यावर्षी चुकीचे ठरत आहेत. जो काही पाऊस झाला आणि त्यात ज्या पेरण्या झाल्या त्या पिकांना पाऊस थांबल्यामुळे फटका बसणारच आहे. पण ज्यांनी अजूनही पेरण्या केल्या नाहीत, त्यांनी १५ जुलैनंतर पेरण्या केल्यास २५ टक्के उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार आहे. कारण पेरणीचा एक विशिष्ट हंगाम असतो आणि त्या हंगामात पेरणी होऊ शकली नाही.
श्रीधर ठाकरे, कृषीतज्ज्ञ