पावसाअभावी राेवणीयाेग्य पऱ्हे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:10+5:302021-07-04T04:07:10+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यात पंधरवड्यापासून पाऊस अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे पऱ्ह्यांमधील धानाच्या राेपांची वाढ खुंटली असली तरी ...

Crisis due to lack of rains | पावसाअभावी राेवणीयाेग्य पऱ्हे संकटात

पावसाअभावी राेवणीयाेग्य पऱ्हे संकटात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यात पंधरवड्यापासून पाऊस अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे पऱ्ह्यांमधील धानाच्या राेपांची वाढ खुंटली असली तरी ते राेवणीला आले आहेत. बांध्या काेरड्या असून, चिखलणी करण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे राेवणीची कामे खाेळंबली आहेत. शिवाय, पाऊस व ओलिताचे प्रभावी साधन नसल्याने राेवणीयाेग्य पऱ्हे पाण्याअभावी संकटात सापडले आहेत.

जून महिन्यातील पावसाचे महत्त्वाचे दिवस निघून गेले आहेत. या काळात तालुक्यात कुठेही दमदार व राेवणीयाेग्य पाऊस काेसळला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३० जूनपर्यंत सरासरीपेक्षा १७.३ मिमी पाऊस कमी काेसळल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. समाधानकारक पाऊस न बरसल्याने राेवणी कशी करावी, असा प्रश्न धान उत्पादकांना पडला आहे. दुसरीकडे, पावसाअभावी तसेच पाण्याची साेय नसल्याने पऱ्ह्यांमधील राेपट्यांची वाढ खुंटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

रामटेक तालुक्यातील २७ गावांचा समावेश पेंच प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित १२० गावांमधील शेतकऱ्यांना सिंचनाची काेणतीही साेय नसल्याने पिकाला पाणी देण्यासाठी, तसेच राेवणी करण्यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तालुक्यात विहिरी व इलेक्ट्रिक माेटरपंपद्वारे ओलित करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही फार कमी आहे.

कृषी विभागाने तालुक्यात यावर्षी २१,५०० हेक्टरमध्ये धान, ३,५०० हेक्टरमध्ये कपाशी व २,१०० हेक्टरमध्ये तुरीच्या पिकाचे नियाेजन केले आहे. पाऊस नसल्याने धानाच्या राेवणीला सुरुवात व्हायची आहे. इतर पिकांची पेरणी आटाेपली असून, ही पिके अधूनमधून काेसळणाऱ्या सरींवर तग धरून आहेत. हवामान खात्याचे अंदाज पूर्णपणे चुकले असून, यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता बळावली आहे, अशी प्रतिक्रिया महादुला (ता. रामटेक) येथील शेतकरी धनराज झाडे यांनी व्यक्त केली.

...

१७.३ मिमी कमी पाऊस

रामटेक तालुक्यात ३० जूनपर्यंत सरासरी २५६.८२५ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. तालुक्यातील रामटेक मंडळात २९१.६ मिमी, देवलापार मंडळात २१५ मिमी, नगरधन मंडळात ३०२.९ मिमी व मुसेवाडी मंडळात २१७.८ मिमी. पाऊस काेसळल्याची नाेंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेला पंधरवडा हा पावसाचा हाेता. या काळात तालुक्यात सरासरीपेक्षा १७.३ मिमी कमी पाऊस काेसळला. शिवाय, कुठेही दमदार पाऊस काेसळल्याची नाेंद नाही.

...

शेतकऱ्यांनी किमान १०० मिमी पाऊस काेसळल्यानंतर पेरणीला सुरुवात करावी. यापूर्वी पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. तालुक्यात आजवर २५६.८२५ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. दमदार पाऊस काेसळल्यास पुढील आठवड्यापासून राेवणीला सुरुवात हाेऊ शकते.

- स्वप्निल माने,

तालुका कृषी अधिकारी, रामटेक.

...

पऱ्हे राेवणीयाेग्य झाले आहेत. चिखलणी व राेवणी करण्यासाठी सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी, तसेच उन्ह तापत असल्याने पऱ्हे सुकायला सुरुवात झाली आहे. या भागात वीज, विहिरी व कालव्याचे पाणी उपलब्ध नसल्याने शेती करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- कमलेश वैद्य, शेतकरी,

हिवरा (बेंडे), ता. रामटेक.

Web Title: Crisis due to lack of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.