तलाव नूतनीकरणाची मुदत संपल्याने मासेमारांपुढे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 07:00 AM2020-05-01T07:00:00+5:302020-05-01T07:00:11+5:30

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात इतर लहान-मोठ्या व्यवसायप्रमाणे मासेमारी व्यवसायालाही ग्रहण लागले आहे. अशा परिस्थितीत मत्स्यपालन विभागाच्या एका आदेशाने मत्स्यव्यवसाय सोसायटी यांची चिंता वाढवली आहे.

Crisis for fishermen due to expiration of lake renewal period | तलाव नूतनीकरणाची मुदत संपल्याने मासेमारांपुढे संकट

तलाव नूतनीकरणाची मुदत संपल्याने मासेमारांपुढे संकट

Next


निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात इतर लहान-मोठ्या व्यवसायप्रमाणे मासेमारी व्यवसायालाही ग्रहण लागले आहे. अशा परिस्थितीत मत्स्यपालन विभागाच्या एका आदेशाने मत्स्यव्यवसाय सोसायटी यांची चिंता वाढवली आहे. राज्यातील तलावात मासेमारी करण्याच्या लीजची वार्षिक ठेव भरण्याची मुदत ३० एप्रिल रोजी संपणार आहे आणि निर्धारित वेळेत लीजची वार्षिक ठेव भरण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. व्यवसाय ठप्प असताना वार्षिक ठेव भरायची कशी, हा प्रश्न मासेमारी सोसायटी यांना पडला आहे.

राज्यात तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी मासेमारांना तलावाचे कंत्राट घ्यावे लागते. ही लीज पाच वर्षांची असते व दरवर्षी ३० एप्रिलपर्यंत त्याचे नूतनीकरण करावे लागते. तलावाचे कंत्राट मत्स्यपालन सोसायटीमार्फत किंवा वैयक्तिकही घेतले जाते. कंत्राटाची वार्षिक ठेव भरून त्या व्यक्ती किंवा सोसायटीद्वारे संबंधित तलावात मासेमारी सुरू राहते. ज्याने ही वार्षिक रक्कम भरली नाही त्याचे कंत्राट रद्द करून नव्याने प्रक्रिया केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, तलावाच्या कंत्राटाची वार्षिक ठेव भरण्यासाठी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिक सोसायटी यांना विभागामार्फत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प असताना लीजची वार्षिक रक्कम कशी भरायची, हा प्रश्न मासेमारांपुढे पडला आहे.
मासेमारांना लॉकडाऊनमधून सूट असून तलाव आणि नदीघाटावरून सुरक्षेचे नियम पाळून मासेमारी करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र मासेमारीची परवानगी असली तरी मार्केट उपलब्ध नसल्याने मासे पकडून उपयोग काय, असा प्रश्न पवनी मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचे प्रकाश पचारे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे व्यवसाय बंद असल्याने आधीच मासेमारांपुढे आर्थिक संकट ओढवले असताना, लीजची रक्कम भरणे शक्य नसल्याची भावना मच्छीमार सहकारी संस्था, नागपूरचे रमेश कामठे यांनी व्यक्त केली आहे.

विदर्भात २० हजाराच्यावर तलाव

प्रकाश पचारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात २० हजाराच्यावर तलाव आहेत. नागपूर जिल्ह्यात मासेमारीचे कंत्राट असलेले १३५ च्या जवळपास तलाव आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक २००० च्यावर, भंडारा जवळपास १६०० तर गोंदिया जिल्ह्यात १९०० च्या जवळपास तलाव आहेत. यात मामा तलाव आणि मोठ्या तलावांचा समावेश आहे. यावर मासेमारी करणाऱ्या ६५० च्या जवळपास सोसायटी असून, हजारो मासेमार त्याअंतर्गत काम करतात. या संकटाच्या वेळी लीजची देयके भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी या सोसायटींनी केली आहे.

तलावांच्या लीजचे वार्षिक देयके भरण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे. मात्र ही रक्कम न भरल्यास ३० जूनपर्यंत दंडासह रक्कम भरता येते. मात्र लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प असल्याने परिस्थिती बघता मासेमारांना मुदतवाढ देण्याची विनंती आधीच विभागाच्या मुख्यालयाकडे केली आहे. मात्र यावेळी मासेमार आणि मत्स्यपालन सोसायटी याकडूनही निवेदन आल्यास या विनंतीला वजन येईल. त्यांना व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर निवेदन पाठविण्याचे आवाहन केले आहे.
गीतेश पेशवे, विभागीय आयुक्त, मत्स्यपालन विभाग, नागपूर

 

Web Title: Crisis for fishermen due to expiration of lake renewal period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.