निर्बंधांचे पालन न केल्यामुळेच इटलीसमोर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:15 PM2020-03-24T12:15:38+5:302020-03-24T12:16:52+5:30
‘‘रुग्णवाहिका जेव्हा रस्त्यांनी जातात तेव्हा तेथील रहिवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो. मनात विचार येतो की, कोरोनाने जीव घेतलेल्या त्या दुर्दैवी लोकांच्या यादीत आणखी एकाची भर पडली की काय? इटली म्हणजे अनेकांच्या स्वप्नांना साकार करणारा देश.
अंकिता देशकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दुसऱ्या महायुद्धात इटलीला फारच उद््ध्वस्त व्हावे लागले. त्यानंतर युरोपमधील अत्यंत उत्साही, तरतरीत अशा इटालियन लोकांसमोर प्रथमच कोरोना विषाणूने फार मोठे संकट उभे केले आहे. इटलीने निर्बंधांचे पालन न केल्यामुळेच इटलीसमोर फार मोठे संकट उभे ठाकले आहे.
‘‘रुग्णवाहिका जेव्हा रस्त्यांनी जातात तेव्हा तेथील रहिवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो. मनात विचार येतो की, कोरोनाने जीव घेतलेल्या त्या दुर्दैवी लोकांच्या यादीत आणखी एकाची भर पडली की काय? इटली म्हणजे अनेकांच्या स्वप्नांना साकार करणारा देश.
आज याच देशाचे रूपांतर असे भयाण स्वप्नात होईल याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. लोकांनी आता हळूहळू आशा सोडून देण्यास सुरुवात केली आहे; परंतु आपली श्रद्धा नष्ट होणार नाही याची ते अजूनही कारणे शोधत आहेत,’’ असे मीनाक्षी यांनी म्हटले. संपूर्ण इटलीत परिस्थिती वाईट असून कोविड-१९ च्या फटक्यातून कोणताही प्रांत सुरक्षित राहिलेला नाही, असे भास्कर यांनी सांगितले. सध्या देशात संपूर्ण लॉकडाऊन असून लोकांना फक्त अत्यावश्यक खरेदीसाठीच रस्त्यांवर येऊ दिले जात आहे. इटलीत परिस्थिती इतकी का खालावली, असे भास्कर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘अगदी सुरुवातीपासूनच लोकांनी सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन केले असते आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला असता तर त्यापैकी बहुतेक जणांना कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहता आले असते.’’ भास्कर यांनी सांगितले की, ती आता दारांच्या कड्या, मुठी, कार्सचे सीट बेल्टस् जंतुनाशक वापरून पुसून घेते. हे कुटुंब १४ मार्च रोजी भारतात येणार होते; परंतु लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे रद्द झाले.
या कठोर परीक्षेच्या दिवसांत हे जोडपे एवढे आशावादी कसे राहू शकले? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘‘माझ्या कुटुंबियांनी दिलेले प्रेम व घेतलेली काळजी आणि दूरध्वनीद्वारे आमच्या संपर्कात असलेले मित्र हे आमच्या सकारात्मकतेचे स्रोत आहेत.’’ देशात पोलिसांकडून मदत व दयाळूपणा अनुभवास येतो का, असे विचारले असता भास्कर यांनी कळवले की, ‘‘वयोवृद्धांच्या मदतीसाठी ते धावतात, त्यांना अन्न, खाद्यपदार्थ व औषधे आणून देण्याचे काम ते करतात. वसाहतींत मदत करताना पोलीस अनेक ठिकाणी दिसतात. ते नेहमीच मदतीचा हात पुढे करताना दिसतील.’’परिस्थितीचे गांभीर्य संपूर्ण जगात लोकांनी समजून घेण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. लोक अगदी सहजपणे प्रतिबंधक उपायांचे, नियमांचे उल्लंघन करतात व मला काहीच होणार नाही, असा समज करून घेतात; पण असे वर्तन करणाऱ्यांना कोरोना व्हायरस महामारीने चुकीचे सिद्ध केले आहे.
इटलीने परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही व आज जगात सगळ्यात मोठा फटका सोसत असलेला असा तो देश बनला आहे. सगळ्यांसाठीच अत्यंत कठोर परीक्षेच्या या दिवसांत अत्यावश्यक सेवा पुरवत असलेल्या लोकांबद्दल आपण प्रत्येकाने कृतज्ञ राहिले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. अशा मदतीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर उपलब्धही आहेत. इटलीने ज्या चुका केल्या त्यापासून भारताने धडा घेऊन त्या करू नयेत, असेही आवाहन त्यांनी केले.