पारंपरिक फडे विक्रेत्यांवर संकट; स्वयंसेवी संस्थांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 07:12 PM2020-04-29T19:12:29+5:302020-04-29T19:12:48+5:30
इतरांची घरे स्वच्छ करण्याचे साधन विकणाऱ्या पारंपरिक फडे विक्रेत्यांवर ‘झाडून’ संकट लॉकडाऊनमुळे आले आहे. फडे विकता येत नाहीत आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिंदीच्या झाडांची काटेरी पाने तोडणे आणि त्यांचे सुबक अशी झाडू बनवून, ते विकून आपल्या संसाराचा गाडा हाकणे असे त्यांचे काम; मात्र इतरांची घरे स्वच्छ करण्याचे साधन विकणाऱ्या पारंपरिक फडे विक्रेत्यांवर ‘झाडून’ संकट लॉकडाऊनमुळे आले आहे. फडे विकता येत नाहीत आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे.
सध्या यशोधरानगर पोलीस स्टेशनअंतर्गत एचसीजी कॅन्सर रुग्णालयाजवळ असे ६०-७० लोक वास्तव्यास आहेत. यांच्यासारखेच काही वाडी परिसरात ४०-५० लोक आहेत. मूळचे पारधी या शिकारी जमातीतील हे लोक आदिवासी म्हणून छत्तीसगडच्या बिलासपूर, जहांगीरचाफा, धनगाव या परिसरातील आहेत. यांच्यातील थोडा शिकलेला रवी मालिया या युवकाने आपबीती मांडली. शिंदीच्या झाडांच्या फांद्यापासून फडे तयार करून विकणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. ही शिंदीची पाने ओडिसावरून नागपूरला आणली जातात. साधारणत: दिवाळीनंतर ही सर्व मंडळी नागपूरला येतात. नागपूरप्रमाणे यवतमाळच्या वणी आणि चंद्रपूरच्या तळोधी बाळापूर या भागातही यांचे वास्तव्य असते. ओडिशावरून आलेल्या शिंदीच्या फांद्यांचे सुबक असे फडे तयार करणे आणि नंतर गावोगावी नेऊन विकणे, असे त्यांचे काम चालते. डिसेंबर ते मे-जूनपर्यंत त्यांचे हे काम चालते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते सर्व आपल्या मूळ गावाकडे परत जातात.
यावर्षीही ते याच नियमानुसार नागपूर व इतर भागात पोहचले. त्यांनी फडे तयार करण्याचे कामही सुरू केले होते. मात्र आता ऐन विक्रीच्या वेळी कोरोनाचे संकट ओढवले. देशात आणि राज्यातही लॉकडाऊन करावा लागला. त्यामुळे त्यांचा व्यवसायच ठप्प पडला आहे. व्यापार करता येत नाही आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे या जमातीवर उपासमारीची पाळी आली आहे. जगण्याचा मोठा संघर्ष त्यांना करावा लागत आहे.
स्वयंसेवी संस्थांचा आधार
काही स्वयंसेवी संस्थांचे लोक आशा संकटाच्या वेळी फडे विकणाºया या पारधी आदिवासी जमातीच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांची माहिती मिळताच संघर्षवाहिनीच्या कार्यकर्त्यांनी परिस्थिती पाहून त्यांच्या पुढ्यात धान्य दिले. इतरही तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली.