प्रशासनाकडून गंभीर चुका
By admin | Published: April 2, 2015 02:29 AM2015-04-02T02:29:08+5:302015-04-02T02:29:08+5:30
मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून गंभीर चुका झाल्या, त्यामुळेच पाच खतरनाक कैदी कारागृहातून पळून जाऊ शकले,
नागपूर : मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून गंभीर चुका झाल्या, त्यामुळेच पाच खतरनाक कैदी कारागृहातून पळून जाऊ शकले, अशी स्पष्ट कबुली अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरूंग) मीरा बोरवणकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांपुढे दिली.
मंगळवारी पहाटे पाच खतरनाक कैदी मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, आज सकाळी पुणे आणि बुलडाणा येथून दोन चौकशी पथके नागपूर कारागृहात सकाळीच पोहचली. खुद्द मीरा बोरवणकरही येथे आल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्या कारागृहात पोहचल्या. तब्बल साडेचार तास त्यांनी आतमध्ये पाहणी केली.
बडी गोल, बराक क्रमांक ६, घटनास्थळ बघितल्यानंतर त्यांनी कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. रात्री ८.३० ला त्या कारागृहातून बाहेर पडल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित केली असता त्या म्हणाल्या, मी आज घटनास्थळ बघितले. त्या रात्री कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याशी चर्चा केली. बराकीत त्या रात्री कोणता वार्डन होता, त्याची माहिती घेतली आणि घटना कशी घडली, त्याची माहिती घेतली.
कारागृह प्रशासनाच्या चुकीमुळेच ही घटना घडली हे बरोबर आहे का, असा प्रश्न केला असता त्यांनी त्याला स्पष्ट दुजोरा दिला. प्रशासनाच्या गंभीर चुका झाल्या त्याचमुळे हे पाच कैदी पळून जाऊ शकले, असे त्या म्हणाल्या. कारागृहात अनेकदा मोबाईल, गांजा असे अमली पदार्थ आढळले होते, त्याची माहिती नव्हती का, या गैरप्रकाराला कोण दोषी आहे, असा प्रश्न केला असता त्यांनी मोबाईल गांजासह गैरप्रकार होत होते, याला दुजोरा दिला. मात्र, त्याला कोण किती दोषी आहे, ते आता सांगता येणार नसल्याचे बोरवणकर म्हणाल्या. या गैरप्रकाराबाबत तुमच्याकडे वेळोवेळी तक्रारी झाल्या, अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवले. तुमच्याकडून कारवाई का झाली नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी यावर थेट बोलण्याचे टाळले. हे सर्वच अहवाल आपण गृहमंत्रालयाकडे पाठविल्याचे त्यांनी सागिंतले. (प्रतिनिधी)