ही तर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केलेली टीका : श्रीपाद जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:09 PM2019-04-01T21:09:56+5:302019-04-01T21:28:05+5:30
साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केल्यानंतर डॉ. जोशी यांनीही पलटवार केला. महामंडळाचे तीन वर्षे चाललेले कार्य महामंडळाच्या घटनादत्त तरतुदीनुसार आणि समाविष्ट, घटक व संलग्न संस्थांच्या सर्वसंमतीने चालले आहे, पण काहींना हेच अडचणीचे जात असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लावला. इतर सर्व संस्थांचे सहकार्य लाभले असताना, नाव न घेता त्यांच्याच संस्थेने सहकार्य केले नसल्याचा आरोप केला. केवळ पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन व पश्चातबुद्धीने ही टीका करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केल्यानंतर डॉ. जोशी यांनीही पलटवार केला. महामंडळाचे तीन वर्षे चाललेले कार्य महामंडळाच्या घटनादत्त तरतुदीनुसार आणि समाविष्ट, घटक व संलग्न संस्थांच्या सर्वसंमतीने चालले आहे, पण काहींना हेच अडचणीचे जात असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लावला. इतर सर्व संस्थांचे सहकार्य लाभले असताना, नाव न घेता त्यांच्याच संस्थेने सहकार्य केले नसल्याचा आरोप केला. केवळ पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन व पश्चातबुद्धीने ही टीका करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विर्दी साहित्य संघाकडे असलेले कार्यालय मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादकडे हस्तांतरित झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारताच प्रा. कौतिकराव यांनी डॉ. जोशी एकाधिकारशाहीने कारभार चालवित असल्याचा आरोप केला होता. संमेलन अध्यक्षांची निवडणूक रद्द करण्यासह बाहेरील संस्थांना स्थान देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत डॉ. जोशी आपलाच तोरा चालवित होते, असा आरोप केला. महामंडळाला मिळालेली देणगी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू, असेही ठाले-पाटील बोलले. त्यावर उत्तर देताना डॉ. श्रीपाद जोशी यांनी ‘महामंडळाच्या कार्याचा नीट अभ्यास करा’, अशी उपरोधिक सूचना केली. ते म्हणाले की, महामंडळ पुण्याकडे असताना प्राप्त देणगीचा विनियोग कसा करायचा याबाबत महामंडळाने ठराव करून जो निर्णय घेतला होता त्याचे पालन महामंडळाच्या घटक, समाविष्ट व संलग्न अशा महाराष्ट्रातील व महाराष्ट्राला बाहेरील मिळून एकूण दहा संस्थांपैकी नऊ संस्थांनी गेले तीन वर्षे केले. त्यामुळेच महामंडळाला विविध कार्यशाळा, शिबिरे ,बहुभाषिक मेळावे, लेखक मेळावे, असे कार्य करता आले. एवढेच नव्हे तर तसे करणे ठरावानुसार बंधनकारकच असल्याने महामंडळाचे कार्यवाह व कार्यालय यांचे काम अंमल तेवढा करण्याचे असते. विदर्भाकडे असताना महामंडळाने ठरावानुसारच त्या देणगीचा विनियोग केल्याने महामंडळाला लाभच झालेला असल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही संस्थेचे कार्य विशिष्ट पदावरील विशिष्ट व्यक्तीच्या मताने नव्हे तर संस्थेच्या घटनात्मक ठरावानुसार व संमत अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार चालत असते. साहित्य महामंडळ ही संस्थासुद्धा धर्मादाय कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था आहे व घटनेत नमूद ठरावानुसार तिचे कार्ये चालतात. ही कार्ये जर कुणी नीट वाचली नसतील तर पुन: वाचली पाहिजेत, अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी दिली. केवळ संमेलन घेणे हे महामंडळाचे एकमेव कार्य नमूद नाही. ते अनेक कार्यापैकी एक आणि क्रमांक तीनवर नमूद एक कार्य आहे. एखाद्या विशिष्ट संस्थेकडे असलेले महामंडळ कार्यालय त्या मर्यादित कार्यकाळात त्याला सोपवलेली ही अनेक घटनादत्त कार्ये निष्ठेने व समर्थपणे पार पाडते हेच काही विशिष्ट लोकांना अडचणीचे ठरत असल्याचा आरोप डॉ. जोशी यांनी केला. ही त्यांची व्यक्तिगत मते असू शकतात, घटनात्मक व संस्थात्मक वास्तव नव्हे, असेही ते म्हणाले. महामंडळाने त्याचे सोपवलेले घटनात्मक कार्य विस्तारण्याची गरजच जर वाटत नसेल तर या महामंडळाच्या निर्मितीचे प्रयोजनच चुकले आहे काय किंवा आता त्याची गरजच वाटेनाशी झाली आहे काय, असा सवाल त्यांनी केला.
मग आयकर कोण भरेल?
महामंडळाला मिळणारी देणगी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू असे कौतिकराव सांगत असले तरी पुण्यात झालेल्या ठरावानुसार ते शक्य नाही. हा निधी कार्य करण्यासाठी मिळतो ठेवण्यासाठी नाही. आणि ठेवलाच तर त्यावर येणारा आयकर कोण भरेल, असा सवाल महामंडळाच्या एका माजी सदस्याने केला आहे. महामंडळाला जे ५७ वर्षात जमले नाही ते मराठी भाषा, साहित्य व संस्कृती धोरण ठरविण्याचे महत्त्वपूर्ण काम या काळात झाले. संमेलन अध्यक्षांची निवडणूक पद्धत रद्द करण्यात आली व इतर महत्त्वाची कामे महामंडळाने विदर्भाकडे असताना केली. त्यामुळे केवळ टीका करण्यापूर्वी याचाही विचार व्हावा, असे मत संबंधित सदस्याने व्यक्त केले.