फडणवीसांवर टीका; गडकरींचे गायले गोडवे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 06:04 AM2021-11-18T06:04:26+5:302021-11-18T06:05:13+5:30
नागपुरातील व्यापाऱ्यांशी पवार यांनी बुधवारी संवाद साधला. प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भ दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. दुसरीकडे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यप्रणालीची त्यांनी प्रशंसा केली. एकाच पक्षाच्या दोन नेत्यांबाबत पवार यांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नागपुरातील व्यापाऱ्यांशी पवार यांनी बुधवारी संवाद साधला. प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो. पाच वर्ष विदर्भाकडेच राज्याची सत्ता होती, मात्र असे असूनही येथील उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर होऊ शकल्या नाहीत. मुळात समस्या सोडविण्यासाठी नेतृत्वात विकास दृष्टी असावी लागते, या शब्दांत पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
यानंतर अचानक पवार यांनी ‘गिअर’ बदलला व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. केंद्र सरकारमध्ये काही नेते असे आहेत जे पक्ष, प्रांत यांचा विचार न करता पूर्ण देशाच्या विकासाचा विचार करतात. अगदी विरोधी पक्षाचा खासदार असो किंवा संसदेतील कुठलाही सदस्य, त्यांची समस्या दूर करण्याची इच्छा दाखविणारे कमी मंत्री आहेत. त्यात नितीन गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने येते. त्यांच्यासमोर समस्या आल्या की, त्याचा तोडगा ते काढणार, असे पवार म्हणाले.
शरद पवार यांनी असे काढले चिमटे
nराज्यात झालेल्या हिंसाचारामागे मतांच्या ध्रुवीकरणाचे षडयंत्र असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यावर पवार यांनी फडणवीस यांना चिमटा काढला.
nचंद्रकांत पाटील असे बोलले
असते तर, मला काही वाटले नसते, परंतु फडणवीसांकडून असे वक्तव्य आल्याने आश्चर्य वाटले. सत्ता गेल्यावर माणसे किती अस्वस्थ होतात, हे दिसून येते, असे ते म्हणाले.