समीक्षकांनी कलाकृतीकडे स्वतंत्रपणे पहावे

By admin | Published: July 28, 2014 01:28 AM2014-07-28T01:28:34+5:302014-07-28T01:28:34+5:30

साहित्यात समीक्षा हा अतिशय महत्त्वाचा आणि स्वागतार्ह वाङ्मयीन प्रकार आहे. समीक्षेशिवाय कुठल्याच वाङ्मयाला संपूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. कारण समीक्षा तटस्थपणे कलाकृतीचे मोजमाप करीत असते

Critics should see the artwork separately | समीक्षकांनी कलाकृतीकडे स्वतंत्रपणे पहावे

समीक्षकांनी कलाकृतीकडे स्वतंत्रपणे पहावे

Next

महेश एलकुंचवार : डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन
नागपूर : साहित्यात समीक्षा हा अतिशय महत्त्वाचा आणि स्वागतार्ह वाङ्मयीन प्रकार आहे. समीक्षेशिवाय कुठल्याच वाङ्मयाला संपूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. कारण समीक्षा तटस्थपणे कलाकृतीचे मोजमाप करीत असते आणि त्याच्या चांगल्या-वाईट बाबींवर प्रकाश टाकते. पण प्रत्येक प्रथितयश लेखकाला स्वत:च्या उणिवांची जाणीव असते. समीक्षेत त्यांची तुलना केल्या जाते तेव्हा वाईट वाटते, असे मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले.
डॉ़ अक्षयकुमार काळे यांच्या ‘अर्वाचीन मराठी काव्यमीमांसा गौरव ग्रंथाचे’ प्रकाशन प्रा़ एलकुंचवारांच्या हस्ते रविवारी करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते. डॉ़ अक्षयकुमार काळे गौरव समिती, वरुड परिसर मित्र परिवार व पद्मगंधा प्रकाशनच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त त्यांच्या ‘अर्वाचीन मराठी काव्यमीमांसा’ या ग्रंथाचे व डॉ़ राजेंद्र नाईकवाडे संपादित गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा़ सुरेश द्वादशीवार, डॉ़ गिरीश गांधी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे, डॉ. प्रदीप विटाळकर उपस्थित होते़
काही वेळेला मते व्यक्त केली की तो समीक्षक आणि काही समीक्षा पूर्ण केल्या तर तो विचारवंत असा आपला काहीसा समज आहे. आपल्याकडे समीक्षेची अभिजात आणि मोठी परंपरा आहे. पण याचा अर्थ प्रत्येक समीक्षा परिपूर्ण असतेच असे नाही. समीक्षक समकालीन असल्याने स्थलकालसापेक्षतेचा परिणाम समीक्षेवर होतोच. समीक्षकांच्या तुलनात्मकतेने तो जगाचा लेखक होत नाही. पण अस्सल साहित्यिक मात्र समीक्षकांना पुरून उरतो. ग्रेस यांच्या कवितांवरील समीक्षेतून आजही स्त्रीचा पदरच दिसतो. ग्रेसांना भावलेल्या स्त्रियांची कविता दिसत नाही. त्यामुळेच त्यांच्यावरची समीक्षा अपुरी वाटते, असे एलकुं चवार म्हणाले.
कविता कविची प्रेयसीच असते़ती कविची मुलगीही असते़ मी दोन्ही बाजूने कायम कवितेचा प्रियकर होण्याचाच प्रयत्न केला आहे़ कवितेचा आनंद अलौकिक असून तो उपभोगण्याची प्रक्रियाही अलौकिक आहे़ माझे अंत:करण व मन सदैव कवितेतच रमले, असे डॉ़ अक्षयकुमार काळे म्हणाले.
संचालन डॉ़ कोमल काळे यांनी तर ग्रंथाचा परिचय व प्रास्ताविक डॉ़ राजेंद्र नाईकवाडे यांनी केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Critics should see the artwork separately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.