CronaVirus in nagpur : विदर्भात कोरोनाबाधितांची शतकाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 08:05 PM2020-04-13T20:05:37+5:302020-04-13T20:06:58+5:30
नागपुरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी १४ रुग्ण आढळून आले असताना सोमवारी आणखी तीन तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांसह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ९६ झाली असून शतकाकडे वाटचाल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपर : नागपुरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी १४ रुग्ण आढळून आले असताना सोमवारी आणखी तीन तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांसह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ९६ झाली असून शतकाकडे वाटचाल आहे. नागपुरात आतापर्यंत ४७ तर यवतमाळमध्ये रुग्णाची संख्या १२ झाली आहे. विदर्भात नागपूर, बुलढाणा, गोंदिया, वाशिम, अमरावती, अकोला व यवतमाळ या सात जिल्ह्यातच कोरोना विषाणूची लागण आहे. नागपुरनंतर सर्वाधिक रुग्ण बुलढाण्यात आढळून आले आहेत. या जिल्ह्यात १७ रुग्ण व यातील एकाचा मृत्यूची नोंद आहे. अकोला जिल्ह्यात १३, यवतमाळ जिल्ह्यात १२, अमरावती जिल्ह्यात पाच रुग्ण व एक मृत्यू तर गोंदिया व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. सोमवारी नागपुरात नोंद झालेले तिन्ही रुग्ण मरकजहुन आले होते. यांना ३१ मार्च रोजी आमदार निवासात क्वारंटाइन करण्यात आले. यांच्यासोबत असलेल्या चार रुग्णांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने यांचेही नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यात या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) तपासलेल्या ३० नमुन्यापैकी यवतमाळ जिल्ह्याचे ११ नमुने तपासण्या आले. यात एक पॉझिटिव्ह तर १० नमुने निगीटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा ४० वर्षीय पुरुष आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १७ नमुन्यामधून १० नमुने निगेटिव्ह आले. सात नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील तपासलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आले.- तीन मृत्य व ११रुग्ण बरे विदर्भात आतापर्यंत नोंद झालेल्या ९६ रुग्णांमधून ११ रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. यात नागपुरातील आठ तर अमरावती जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. खबरदारी म्हणून या रुग्णांना घरीच राहण्याचा सल्ल दिला आहे. कोरोनाबाधित मृतांची संख्या तीन आहे. यात नागपूर, बुलढाणा व अमरावतीमधील प्रत्येकी एक मृताचा समावेश आहे.