नागपूर जिल्ह्यात विद्युत टॉवरमुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:54 AM2018-03-01T10:54:12+5:302018-03-01T10:54:19+5:30
कळमेश्वर तालुक्यातील काही भागात खासगी वीजनिर्मिती कंपनीच्यावतीने टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील काही भागात खासगी वीजनिर्मिती कंपनीच्यावतीने टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या कंपनीने खैरी (हरजी) शिवारात संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही तोंडी अथवा लेखी पूर्वसूचना संबंधित शेतकऱ्यांना न देता त्यांच्या शेतात टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर अधिकारी असंबद्ध उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतातील टॉवरमुळे शेतांची किंमत कमी होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.
परिणामी, पोलीस व महसूल विभागाने या संपूर्ण प्रकाराची पाहणी करावी आणि संबंधित शेतकऱ्यांना कंपनीकडून बाजारभावाप्रमाणे नुकसानभपाई मिळवून द्यावी तसेच शेतातील टॉवरच्या जागेचा मोबदला देण्यात यावा, मोबदला व नुकसानभरपाई मिळेपर्यंत काम बंद ठेवावे, शेतात ठेवण्यात आलेले टॉवरचे साहित्य तत्काळ उचलावे अशी मागणी दिलीप राऊत, नारायण बन्सोड, राहुल आंबोले, प्रभाकर आंबोले, सुभाष खंडागळे, जावेद शेख, तानाजी बावणे, झिंगूजी गोंड, सुधाकर भापकर, छत्रपती बुरबुरे, अनिल गोडे, राजेश तिडले, मनीष शेंडे, गणेश चिखले, हमीदा शेख, प्रमोद भापकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली असून, कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.