पीक विमा कंपन्या मालामाल; २०.४३ कोटी भरले; शेतकऱ्यांना मिळणार १०.४७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 11:42 PM2021-05-22T23:42:06+5:302021-05-22T23:43:14+5:30
Crop insurance मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.
नागपूर जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला तीन वर्षासाठी काम देण्यात आले आहे. २०२०-२१ च्या खरीप हंगामात कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या ३०,०२४ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला. प्रशासनाकडूनही प्रोत्साहित करण्यात आले. दुर्दैवाने गतवर्षी अवकाळी पाऊस आला. ऐन सोयाबीन कापणीच्या वेळी वाहून गेले. संत्रा, फळ-भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराने पिके खरडून निघाली. पाहणीसाठी केंद्रीय पथकही आले होते. मात्र आणेवारी जाहीर करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. अनेकांचे नुकसान होऊनही पीक विम्याची मदत २१ ते २२ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
खरीप २०२०-२१
पीक विमा लागवड क्षेत्र - २७,५३२ हेक्टर
एकूण जमा रक्कम - २०,४३,९३,०००
एकूण मंजूर पीक विमा - १०,४७,०५,८७७
प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ३,७०,९३,०००
राज्य सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००
केंद्र सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००
विमा काढणारे शेतकरी - ३०,०२४
लाभार्थी शेतकरी - ५,८७७
आतापर्यंत किती जणांना मिळाला विमा - २९५
आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - ६४,००,०००
२४,१७४ हजार शेतकरी बाद
३०,०२४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील फक्त ५,८७७ शेतकरीच मदतपात्र ठरले आहेत. लाभासाठी पाच बाबींचे निकष लावण्यात येतात. यातील पीक पेरणी ते काढणीपर्यंत आलेली नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पद्धतीमधील नुकसान या तीन बाबींचाच विचार विम्याची मदत देताना झाला.
विमा भरूनही भरपाई नाही... (शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया)
- धानाचे प्रचंड नुकसान झाले. विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली. अधिकारी बांधावर आले. नुकसानीचे फोटोशूट झाले. पंचनामा करून गेले. ऑक्टोबर-२०२० पासून नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद देत नाहीत. रुपयासुद्धा मिळाला नाही.
-राम कळमकर (शेतकरी), परसोडी, ता. उमरेड
गतवर्षी पावसामुळे आमच्या शेतातील पिके अक्षरश: खरडून गेली. कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सर्व्हे केला. मात्र विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी आम्ही पीक विमा काढणार नाही. या योजनेत केवळ विमा उतरविणारी कंपनी मालामाल होत आहे.
- अनिकेत वराडे, नक्षी, ता. भिवापूर
खरीप पीक विमा योजनेंतर्गत खरीपात लागवड केलेल्या सर्वच पिकांचा विमा मी काढला होता. पिकाचे नुकसान होऊनही यादीत नाव आले नाही. असाच अन्याय होत राहिला तर पीक विमा काढून फायदा काय? मदत मिळणार नसेल तर आम्हा शेतकऱ्यांना विचार करावा लागेल.
- नितीन चालखोर, चनकापूर, ता. काटोल