बाईक मार्केटिंगद्वारे महाठगबाजाने कोट्यवधी लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:11 AM2019-07-10T10:11:08+5:302019-07-10T10:15:58+5:30

नेटवर्किंग मार्केटिंगच्या नावाखाली आभासी जग निर्माण करणाऱ्या एका महाठगबाजाने देशातील लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये हडपले आहेत.

Crores looted through bike marketing | बाईक मार्केटिंगद्वारे महाठगबाजाने कोट्यवधी लुबाडले

बाईक मार्केटिंगद्वारे महाठगबाजाने कोट्यवधी लुबाडले

Next
ठळक मुद्देनागपूर-विदर्भासह सर्वदूर नेटवर्क दिल्लीच्या महाठगाचे मायाजाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेटवर्किंग मार्केटिंगच्या नावाखाली आभासी जग निर्माण करणाऱ्या एका महाठगबाजाने देशातील लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये हडपले आहेत. संजय भाटी असे या महाठगाचे नाव असून, त्याने व त्याच्या टोळीतील ठगबाजांनी देशभरातील विविध प्रांताप्रमाणेच नागपूर-विदर्भातीलही हजारो लोकांना गंडविल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
महाठग भाटी आणि त्याच्या साथीदारांनी काही वर्षांपूर्वी दिल्लीत मे. गर्वित इनोवेटिव्ह प्रमोटर कंपनी सुरू केली. एकदा या कंपनीत ६२, १०० रुपये जमा करून त्याच्याकडे दुचाकी बूक करायची. ही दुचाकी तो ग्राहकाला देणार नाही. ती दुचाकी तो खाद्य पदार्थ पुरविणाऱ्या किंवा विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांना भाड्याने देईल. त्या बदल्यात या दुचाकीचे सर्व मेंटेनन्स आणि विमा वगैरे करून ज्याने भाटी अ‍ॅन्ड कंपनीकडे जमा केले, त्या सदस्याला त्याच्या दुचाकीचे भाडे म्हणून दर महिन्याला ९७६५, रुपये परतावा मिळेल, अशी ही योजना होती. अवघ्या साडेसात महिन्यात आपली रक्कम वसूल आणि नंतर आयुष्यभर ९७६५ रुपये महिन्याला मिळकत होणार असल्याचे पाहून दिल्ली, नोएडाच नव्हे तर देशातील विविध प्रांतातील हजारो भोळेभाबडे नागरिक भाटी अ‍ॅन्ड कंपनीच्या जाळ्यात अडकू लागले. भाटीच्या बनवाबनवीचे नेटवर्क महाराष्ट्रातही पोहचले अन् नागपूर विदर्भातून हजारो जणांनी महाठग भाटीच्या मे. गर्वित इनोवेटिव्ह प्रमोटर कंपनीत ६२,१०० रुपये जमा करून कागदोपत्री दुचाकी विकत घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. सुरुवातीला ६८ हजार रुपये गुंतविणाऱ्यांना महिन्याला ९ हजार रुपये मिळू लागल्याने महाठग भाटीच्या ‘चिटींग कंपनीची सर्वत्र जोरदार माऊथ पब्लिसिटी झाली. त्यामुळे भाटी अ‍ॅन्ड कंपनीने ६८ हजार गुंतवणाऱ्याला कागदोपत्री (प्रत्यक्ष नाही!) दुचाकी देण्यासोबत आणखी सदस्य जोडा आणि नंतर कंपनीच्या दुचाक्यांची डीलरशिप मिळवून महिन्याला घरबसल्या लाखो रुपये कमवा, अशी ऑफर दिली.
त्यानुसार, एक सदस्य दुसऱ्याला आणि दुसरा तिसऱ्याला या नेटवर्कशी जोडू लागला. आम्ही लाखो रुपये कमवित आहोत, तुम्हीही कमवा, अशी प्रत्येक जण चढवून एकमेकांना ऑफर देत असल्याने भाटी अ‍ॅन्ड कंपनीच्या जाळ्यात हजारो जण अडकले. ज्यात विमा कंपन्यांचे एजंट, निवृत्त अधिकारी, विविध विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी आणि बेरोजगारांची संख्या मोठी आहे. महाठग भाटीच्या चिटींग कंपनीची कुणकुण लागताच उत्तर प्रदेशमधील बुद्धनगर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू झाली. तेथे भाटी आणि साथीदारांविरुद्ध १९ मे २०१९ ला त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर विविध राज्यात महाठग भाटी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. सध्या भाटी दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे.

नातेवाईक, मित्र, मित्रांचे मित्रही फसले
६८ हजार रुपये जमा करून महाठग भाटी आणि साथीदारांच्या जाळ्यात स्वत:ला अडकवून घेणाऱ्या अनेकांनी नंतर कथित डीलरशिप घेण्यासाठी आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्यांना आपल्या साखळीत (चेन नेटवर्किंग) जोडणे सुरू केले. अशा प्रकारे आधी ते अडकले आणि नंतर त्यांनी आपले नातेवाईक, त्या नातेवाईकांचे नातेवाईक, आपले मित्र, मित्रांचे मित्र यांनाही महाठग भाटीच्या जाळ्यात अडकवले. हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे ! असा हा प्रकार ठरला.

बाईक बोट स्कीम
महाठग भाटी आणि त्याच्या साथीदारांनी बनवाबनवीच्या या योजनेला बाईक बोट स्कीम असे नाव दिले होते. त्यात मानेवाडा, हुडकेश्वरमधील रामेश नत्थूजी वराडे (वय ४४), पत्नी तसेच मित्रांसह ४४ जणांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये ८५ लाख, ३९ हजार ९८५ रुपये गुंतविले होते. या सर्वांनी गुन्हे आर्थिक शाखेत तक्रार नोंदवली होती. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी त्याची चौकशी केली. आज सायंकाळी या प्रकरणी हुडकेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crores looted through bike marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.