'पार्सल'च्या माध्यमातून कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे

By नरेश डोंगरे | Published: April 1, 2024 10:17 PM2024-04-01T22:17:13+5:302024-04-01T22:17:24+5:30

रेल्वेच्या पार्सल विभागावर नजर : तपासणी करणाऱ्या यंत्रणा 'अलर्ट'

Crores of cash from here to there through 'Parcel' | 'पार्सल'च्या माध्यमातून कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे

'पार्सल'च्या माध्यमातून कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे

नागपूर: निवडणूकीच्या निमित्ताने कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे होण्याची चर्चा झिरपल्यामुळे विविध यंत्रणांनी रेल्वेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या पार्सल विभागावर नजर रोखली आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतसा सर्वत्र मुक्त हस्ते पैसा उधळला जातो. खास करून मोठ्या प्रमाणात काळा पैसा (ब्लॅक मनी) मोठ्या प्रमाणात बाहेर काढला जातो. या पैशाचा वापर दारू, खाणे-पिणे, वाहने तसेच अन्य सोयी सुविधा खरेदीसाठी केला जातो. ते लक्षात घेता मतदान प्रक्रियेतील गैरप्रकाराला आळा घालणाऱ्या ठिकठिकाणच्या निवडणूक यंत्रणांसह पोलिसांनी प्रत्येक नाके आणि शहराला जोडणाऱ्या दुसऱ्या गावांच्या सिमांवर विविध वाहनांची तपासणी चालविली आहे. खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी मोठी रोकडही पकडण्यात आली आहे. पुढच्या काही तासात बसेसचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. हे सर्व लक्षात घेऊन मोठ्या रकमेची हेर-फेर करणाऱ्यांनी रेल्वेकडे नजर वळविली आहे.

विशेष म्हणजे, नागपुरात अशा प्रकारे कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर केल्या जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. कुरियर मॅन म्हणून काम करणारांच्या हातात मोठ्या रकमेचे पार्सल देऊन ते रेल्वे किंवा बसने पाहिजे त्या ठिकाणी पाठविण्यात येते. अनेकदा रेल्वेने वेगवेगळ्या बॉक्समध्ये, पिंपामध्येही लाखोंची रोकड भरूनही ती ईकडून तिकडे पाठविली जाते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या माणसांपर्यंत अशाच प्रकारे रक्कम पाठविण्यात येत असल्याची कुणकुण लागल्याने रेल्वे पोलिसांसह सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी नागपूर स्थानकावरील पार्सल विभागाची पाहणीही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना, आदेश देण्यात आले आहे.

अशीही क्लृप्ती !
रोकड पकडली जाऊ नये, फारशी तपासणी होऊ नये म्हणून संबंधितांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. मिठाईचे किंवा चॉकलेटचे बॉक्समध्ये लाखोंची रोकड घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविली जाते. आता मात्र औषधांच्या बॉक्समध्ये रोकड घालून ती संबंधितांपर्यंत पोहचविण्याची क्लृप्ती संबंधितांनी अवलंबिली असल्याची चर्चा वजा माहिती आहे.

Web Title: Crores of cash from here to there through 'Parcel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.