नागपुरात मेट्रो रेल्वेत नोकरीच्या नावावर कोट्यवधीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:46 PM2018-10-24T23:46:19+5:302018-10-24T23:54:58+5:30

मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बंटी-बबलीने बेरोजगार युवकांना कोट्यवधीचा चुना लावला. प्रकरण उघडकीस येताच हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्यास अटक केली.

Crores of Rs fraud by lure of giving job in Nagpur metro railway | नागपुरात मेट्रो रेल्वेत नोकरीच्या नावावर कोट्यवधीची फसवणूक

नागपुरात मेट्रो रेल्वेत नोकरीच्या नावावर कोट्यवधीची फसवणूक

Next
ठळक मुद्देआरोपी दाम्पत्यास अटक : साडेतीन महिन्यापासून चालवीत होते टोळी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बंटी-बबलीने बेरोजगार युवकांना कोट्यवधीचा चुना लावला. प्रकरण उघडकीस येताच हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्यास अटक केली.
प्रशांत हेडाऊ (३५) आणि त्याची पत्नी पल्लवी हेडाऊ (३०), अशी आरोपींची नावे आहेत. दोघे नरसाळा येथील स्वागतनगरात राहतात.
प्रशांत पूर्वी प्रॉपर्टी डीलिंगचे काम करीत होता तर पल्लवी ही सुरक्षा एजन्सीत काम करायची. नुकतीच मेट्रो रेल्वेत भरती प्रक्रि या सुरू आहे. लाखो बेरोजगार तरुण नोकरीसाठी आसुसलेले आहेत. या पार्श्वभूमीवर हेडाऊ दाम्पत्यांनी फसवणुकीचा धंदा सुरू केला. त्यांनी परिचित लोकांना मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यातच वैशालीनगर येथील रहिवासी सुमित मेश्राम यांची जुलै महिन्यात आरोपीसोबत भेट झाली. या दम्पत्याने सुमितच्या भाच्याला मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. या मोबदल्यात त्याच्याकडून आठ लाख रुपये घेतले. सुमितप्रमाणेच त्यांनी अनेकांना गंडविले. मेट्रो रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपला संपर्क असल्याचे सांगून, ते लोकांना आपल्या जाळ्यात फसवायचे. सुमितसह काही बेरोजगारांना त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर बोगस नियुक्तीपत्रही पाठविले. नियुक्ती पत्रावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची मोहोर (शिक्का) लागला असल्याने पीडितांना संशय आला नाही. नियुक्ती पत्रावर नियुक्तीची तारीख ७ सप्टेंबर देण्यात आली होती. या बंटी-बबलीने ते सांगतील तेव्हाच मेट्रो कार्यालयात जायचे, असे बजावले होते.
परंतु सुमितसह काही पीडित बोगस नियुक्तीपत्राची प्रिंटआऊट घेऊन मेट्रो कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांना नियुक्तीपत्र बोगस असल्याचे समजले. यानंतर पीडित तरुण हेडाऊ दाम्पत्याकडे पोहोचले. तेव्हा हेडाऊ दाम्पत्यांनी ते स्वत: फसवले गेल्याचे म्हणत रवी सत्यम कुमार याचे नाव सांगितले.
त्यांचे म्हणणे होते की, कुमारलाच त्यांनी पैसे दिले होते. तो पैसे घेऊन फरार झाला.
पीडितांनी पोलीस ठाण्यात जाण्याचा इशारा दिल्यावर बंटी-बबलीने त्यांना शांत राहण्याचा सल्ला देत स्वत:च २२ सप्टेंबरला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन कथित रवी सत्यम कुमार याच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीचा तपास केला असता खरा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी बंटी-बबलीस अटक केली.

 ५० पेक्षा अधिकांना फसवले   
बंटी-बबलीने ५० पेक्षा अधिक बेरोजगारांना फसवल्याचा संशय आहे. आतापर्यंत आठ पीडित ठाण्यात पोहोचले आहेत. त्यांच्याकडून ८७ लाख रुपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे फसवणुकीची ही रक्कम कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जाते. बंटी-बबलीने फसवणुकीची रक्कम आपल्या भरवशाच्या लोकांकडे सोपविली असावी. त्यांच्या मदतीनेच ते आपला व्यवसाय करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

Web Title: Crores of Rs fraud by lure of giving job in Nagpur metro railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.