नागपुरात ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल; जप्ती फक्त १६ लाखांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2023 08:00 AM2023-12-01T08:00:00+5:302023-12-01T08:00:06+5:30

Nagpur News नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरपासूनच ‘नायलॉन’बाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल शहरात असून, पोलिसांनी दीड महिन्यात १६ लाखांहून अधिकचा माल जप्त केला आहे.

Crores worth of 'Nylon' manja in Nagpur; The seizure is only 16 lakhs | नागपुरात ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल; जप्ती फक्त १६ लाखांचीच

नागपुरात ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल; जप्ती फक्त १६ लाखांचीच

ठळक मुद्देदीड महिन्यात पोलिसांकडून हजारो चकऱ्या जप्तगणेशोत्सवानंतरच ‘नायलॉन’बाज सक्रिय

 

योगेश पांडे

नागपूर : मकर संक्रांत जवळ येत असताना शहरात ‘नायलॉन’ मांजाची दहशत वाढीस लागली आहे. एकीकडे मनपा प्रशासनाकडून केवळ नावापुरतीच कारवाई होत असताना नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरपासूनच ‘नायलॉन’बाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल शहरात असून, पोलिसांनी दीड महिन्यात १६ लाखांहून अधिकचा माल जप्त केला आहे.

विक्रीला बंदी असतानादेखील आसमंतात आपल्या पतंगाचे वर्चस्व राहावे यासाठी पतंगबाजांकडून ‘नायलॉन’ मांजाला पसंती देण्यात येते. दरवर्षी अनेक जण जखमी होतात, काहींच्या जिवावर संकट ओढवते व शेकडो पशू-पक्ष्यांनादेखील फटका बसतो. मात्र, मनपा प्रशासनाकडून माल शहरातच येऊ नये यासाठी अगोदरपासून उपाययोजना करण्यात येत नाहीत. नागपूर पोलिसांकडूनदेखील एरवी जानेवारी महिन्यात कारवाईला सुरुवात व्हायची. मात्र, या मोसमात नोव्हेंबर महिन्यात पहिली कारवाई झाली. त्यानंतर पोलिसांनी डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत नायलॉन मांजाच्या तेराशे चकऱ्या जप्त केल्या असून, जवळपास १६ लाखांचा माल जप्त केला आहे. डिसेंबर महिन्यात सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त झाला.

जानेवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई वाढवली व ११ दिवसांतच १० लाखांचा माल जप्त करण्यात आला.

विक्रेत्यांसोबतच सामान्य पतंगबाजदेखील ‘टार्गेट’

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आता ‘नायलॉन’ मांजाच्या विक्रेत्यांसोबतच प्रत्यक्ष पतंग उडविणाऱ्या अतिउत्साही नागरिकांवरदेखील कारवाईला सुरुवात केली आहे. अगदी ‘नायलॉन’ची चक्री बाळगणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात येत आहे. निकालस मंदिर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने पतंग उडविण्यासाठी चक्री विकत घेतली व त्याला पोलिसांनी त्याच्या घराजवळूनच ताब्यात घेतले.

५५ हून अधिक गुन्हे दाखल

आतापर्यंत पोलिसांनी ‘नायलॉन’ मांजा विकणाऱ्या व विकत घेणाऱ्यांविरोधात ५५ हून अधिक गुन्हे दाखल केले आहे. जानेवारी महिन्यातच सर्वाधिक ४२ गुन्हे दाखल करण्यात आले. अजनी, गिट्टीखदान, सक्करदरा, एमआयडीसी, यशोधरानगर, तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया दिसून आल्या.

मनपा प्रशासनाला तस्करांच्या वाकुल्या

दरम्यान, नेहमीप्रमाणे जानेवारी महिन्यात लोक जखमी होऊ लागल्यावर मनपा प्रशासनाला जाग आली व जनजागृती मोहिमांना सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात काही तस्करांनी मनपाच्या हद्दीत गणेशोत्सवानंतरच माल आणून ठेवला होता. दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश येथून मांजा नागपुरात आणण्यात येतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Crores worth of 'Nylon' manja in Nagpur; The seizure is only 16 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kiteपतंग