रेल्वेरूळ ओलांडणे जीवावर बेतले
By admin | Published: September 7, 2016 03:00 AM2016-09-07T03:00:03+5:302016-09-07T03:00:03+5:30
रेल्वेस्थानकावर जीव धोक्यात टाकून रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारे काही मजूर दोन्ही लाईनवरून अचानक गाड्या आल्याने मध्येच अडकले.
शेतमजुराचा मृत्यू : दोन महिला जखमी, रेवराळ स्थानकावरील घटना
कोदामेंढी : रेल्वेस्थानकावर जीव धोक्यात टाकून रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारे काही मजूर दोन्ही लाईनवरून अचानक गाड्या आल्याने मध्येच अडकले. त्यात भीतीपोटी एक मजूर रेल्वेखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोन महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. अन्य नऊ महिला मजूर थोडक्यात बचावल्या. ही घटना मौदा तालुक्यात रेवराळ रेल्वेस्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
मनोहर टीकाराम गजभिये (४२, रा. नीलज - गोंडउमरी, ता. साकोली, जिल्हा भंडारा) असे मृत मजुराचे नाव असून, प्रिया आनंद मेश्राम (३५, रा. नीलज - गोंडउमरी, ता. साकोली, जिल्हा भंडारा) व चंद्रप्रभा मधुकर राऊत (६५, रा. नीलज - गोंडउमरी, ता. साकोली, जिल्हा भंडारा) अशी जखमी महिला मजुरांची नावे आहेत. या तिघांसह जयपाल मेश्राम, जयश्री मेश्राम, मायावती वते, दालंदर रामटेके, मनीषा उके, खुशाल, रामटेके, हेमलता मेश्राम, मदन उके, सुनीता गजभिये असे एकूण १२ मजूर मंगळवारी दुपारी ३ वाजता गोंदिया रेल्वेस्थानकाहून गोंदिया - इतवारी (नागपूर) मेमो रेल्वेने मौदा तालुक्यातील रेवराळ येथे येण्यास निघाले होते. ते सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास रेवराळ रेल्वेस्थानकावर उतरले. त्यांनी काही वेळ रेल्वेस्थानकावर विश्रांती घेतली आणि सर्व साहित्य घेऊन रेवराळपासून दोन कि.मी अंतरावर असलेल्या चारबा येथे जाण्यास निघाले.
सर्व मजूर रेल्वेरूळ ओलांडत चौथ्या लाईनवर आले. या लाईनवर मालगाडी उभी होती. त्यातच दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनवर अचानक गाड्या आल्या. त्यामुळे सर्व मजूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेलाईनच्या मध्ये अडकले. मनोहर गजभिये हा पुढे होता. अगदी जवळून रेल्वे वेगात जात असल्याने गाड्यांचा आवाज, हवा तसेच मागे मालगाडी उभी असल्याने त्यांना हालचाल करण्यासाठी वाव नसल्याने ते चांगलेच घाबरले. घाबरलेल्या अवस्थेत मनोहर गजभिये हा चुकून रेल्वेत अडकला आणि क्षणार्धात त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. शिवाय, प्रिया मेश्राम व चंद्रप्रभा राऊत या दोन महिलांना दुखापत झाली. गाड्या निघून गेल्यानंतर रेल्वेस्थानक व परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. नागरिकांनी महिलांना बाहेर काढले. जखमींवर प्रथमोचार करून भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले. (वार्ताहर)
शेतीच्या कामासाठी आले होते
सध्या मौदा तालुक्यात धानाच्या निंदणाचे काम सुरू आहे. तालुक्यात मजुरांची कमतरता असल्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मजूर दरवर्षी निंदणाच्या हंगामात मौदा तालुक्यात येतात. त्यामुळे सदर मजूर हे मौदा तालुक्यातील चारबा येथील नारायण गढे यांच्याकडे आले होते. या सर्वांचा नारायण गढे यांच्याकडेच ८ ते १० दिवस मुक्काम होता. मृत मनोहर गजभिये हा या मजुरांचा ठेकेदार असल्याची माहिती काही मजुरांनी दिली. मजूर मुक्कामी येत असल्याने त्यांच्याजवळ कपड्यांपासून तर खाण्याच्या साहित्याच्या पिशव्या व गाठोडे होते. या अपघातामुळे मजूरवर्गात दहशत निर्माण झाली आहे.