रूळ ओलांडताय, सावधान ! र्षात २४७ जणांचा गेला जीव, २७ गंभीर
By नरेश डोंगरे | Published: April 12, 2024 11:20 PM2024-04-12T23:20:15+5:302024-04-12T23:20:25+5:30
थोडासा हलगर्जीपणा बेतू शकतो जिवावर
नरेश डोंगरे
नागपूर : तुमच्या जवळपास रेल्वेलाइन असेल आणि तुम्ही ती ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असाल तर सावधान...! कारण यावेळी थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर थेट तुमच्या जिवावर बेतू शकते. जीव वाचला तर जीवघेण्या जखमा होऊ शकतात. होय, अशाच निष्काळजीपणामुळे एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभराच्या कालावधीत तब्बल २४७ जणांचा जीव गेला आहे. अलीकडे ठिकठिकाणचे रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करून त्याच्या बदल्यात भुयारी पूल किंवा उड्डाण पूल बांधण्याचा सपाटा रेल्वे मंत्रालयाने देशभरात लावला आहे. मात्र, हे काम पूर्ण व्हायला अजून बराचसा अवधी लागणार आहे. त्यामुळे ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागात अनेक ठिकाणी, शहराच्या वर्दळीच्या भागात असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेटवरूनच वाहतूक सुरू आहे.
रेल्वे गाडी येण्याच्या काही वेळेपूर्वी हे गेट बंद करून दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली जाते. मात्र, अनेक जण महत्त्वाचे काम असल्याने घाईगडबडीत गेट बंद असूनही रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी वेगात येणाऱ्या रेल्वेगाडीमुळे त्या व्यक्तीचा घात होतो. शहरात रूळ ओलांडणाऱ्यांना गेटवर असलेले अनेक जण विरोध करून थांबवितात. मात्र, ग्रामीण भागात निर्जन ठिकाणी असलेल्या रेल्वे फाटकावर आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून आणि गाडी दूर असल्याचा अंदाज बांधत काही जण रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात अन् स्वत:च्या जिवाशी खेळतात. ग्रामीण भागात, शेतशिवारातून जाणाऱ्या रेल्वेलाइननजीक गुराखी जनावरे चारायला नेतात. ऊन, पावसाच्या वेळी गुराखी सुरक्षित ठिकाण शोधतो. अशावेळी त्याचे दुर्लक्ष झाल्याने जनावरे रेल्वे रुळावर जातात अन् घात होतो. गेल्या वर्षभरात ठिकठिकाणी रेल्वे रूळ ओलांडण्यामुळे २४७ जणांचा वर्षभरात मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले.
गुन्हा, दंड अन् दुर्लक्ष
रेल्वे फाटक बंद असताना रूळ ओलांडणे गुन्हा आहे. हा गुन्हा केल्यास रेल्वेच्या कायद्यानुसार संबंधित व्यक्तीवर कारवाईदेखील केली जाते. मात्र, या कारवाईला अथवा कारवाईच्या इशाऱ्याला फारसे कुणी जुमानत नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात रेल्वे रूळ ओलांडण्याच्या १३३१ घटना घडल्या. हा गुन्हा करताना पकडण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या संबंधित बहाद्दरांकडून रेल्वे प्रशासनाने ६ लाख ८०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे.