मेयोच्या डॉक्टरांवर जमावाची चाल : मृतांचे नातेवाईक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 08:00 PM2020-08-25T20:00:01+5:302020-08-25T20:01:18+5:30
उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी येथील डॉक्टरांनी केली आहे. कोरोनाची लक्षणे असताना तपासणी न करताच घरी राहून स्वत:हून औषधी घेण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, आजार वाढल्यानंतर रुग्ण रुग्णालयात येत असल्याने वाढून अचानक मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याने नातेवाईक आपला संताप डॉक्टरांवर काढत आहेत. लक्षणे नसताना रुग्ण पॉझिटिव्ह आलाच कसा, चालता-बोलता असताना मृत्यू झालाच कसा आदी प्रश्नांना उत्तरे देत मेयोतील डॉक्टर त्रासून गेले आहेत. तरीही त्यांच्याकडून समजविण्याचा प्रयत्न होतो. परंतु रुग्णाचे एकापेक्षा जास्त नातेवाईक प्रश्न विचारीत असल्याने प्रत्येकाला उत्तरे देणे डॉक्टरांना कठीण जात आहे. यातूनच वाद निर्माण होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी असेच झाले, गेल्या चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या बजेरिया येथील ४९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. याचदरम्यान आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच नातेवाईकांनी आपल्या इतर नातेवाईकांना बोलावून कोविड हॉस्पिटलसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात के ली. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने प्रवेशद्वारासह परिसरात जाण्याचा मार्ग रोखून धरला.
नातेवाईकांच्या मते, कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना भेटणे अशक्य असते. त्यांच्या प्रकृ तीची चौकशी कु ठे करावी, हा प्रश्न असतो आणि अचानक रुग्ण गंभीर झाल्याची किंवा मृत्यूची माहिती दिली जाते. यामुळे संतापाचा भडका उडतो. तर, डॉक्टरांनुसार कोविड हॉस्पिटलमध्ये ३०० वर रुग्ण भरती आहेत. रुग्णाचा एकच नातेवाईक नाही तर चार-पाच कधी त्यापेक्षा जास्त नातेवाईक वारंवार रुग्णाच्या प्रकृ तीची विचारपूस करतात, आधीच डॉक्टरांची संख्या कमी, त्यात प्रत्येकवेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण जाते. यातच वारंवार रुग्णालयावर लोकांचा जमाव येत असल्याने डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तही राहत नाही. यामुळे एखाद्यावेळी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.