बँकेतील गर्दी धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:43+5:302021-05-18T04:09:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : झिलपा (ता. काटाेल) येथील बँकेसमाेर खातेदार सकाळी ८ वाजेपासून रांगा लावायला सुरुवात करतात. यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : झिलपा (ता. काटाेल) येथील बँकेसमाेर खातेदार सकाळी ८ वाजेपासून रांगा लावायला सुरुवात करतात. यात मास्क वापरणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे याकडे नागरिक गांभीर्याने लक्ष देत नाहीत. या गर्दीतील काेण काेराेना पाॅझिटिव्ह आणि काेण निगेटिव्ह हे कळायला मार्ग नसल्याने ही गर्दी काेराेना संक्रमणास निमंत्रण देणारी ठरू शकते, असे मत काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.
झिलपा येथे बँक ऑफ इंडियाची शाखा असून, या शाखेत स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय याेजनांचे लाभार्थी यांच्यासह इतरांची खाती आहेत. या शाखेत कर्मचारी वेळेअभावी राेज माेजक्याच खातेदारांची कामे करतात. आपली कामे व्हावीत, म्हणून खातेदार राेज सकाळी ८ वाजेपासून बँक शाखेसमाेर रांग लावायला सुरुवात करतात. वास्तवात, ही बँक राेज सकाळी १० वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असते.
बँकेसमाेरील रांगेत उभे असलेले खातेदार मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यांसह अन्य उपाययाेजनांचे पालन करण्याच्या भरीस पडत नाहीत. याबाबत त्यांना कुणी सल्ला दिला तर ताे ऐकण्याच्याही मन:स्थितीत ते नसतात. या रांगेत काही खातेदार आजारीही असतात. त्यामुळे ही गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेचे व्यवहार सुरू झाल्यानंतरही हीच स्थिती कायम असते. खातेदार कुणाचेही ऐकत नसल्याचे बँक कर्मचारी सांगतात तर बँक कर्मचारी कामाला उशीर करतात, तसेच तेही काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नाहीत, असा आराेप खातेदारांनी केला आहे. दुसरीकडे, संभाव्य धाेका टाळण्यासाठी यावर याेग्य उपाययाेजना करणे गरजेचे आहे, असे मत काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.