अन् गर्दी नियंत्रणासाठी आयुक्त पोहचले बाजारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 22:59 IST2020-11-10T22:51:03+5:302020-11-10T22:59:11+5:30
Crowd control, NMC commissioner reaches market दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. संसर्गाचा धोका विचारात घेता गर्दीवर नियंत्रण घालण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी दिले.

अन् गर्दी नियंत्रणासाठी आयुक्त पोहचले बाजारात!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. संसर्गाचा धोका विचारात घेता गर्दीवर नियंत्रण घालण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी दिले. मंगळवारी आयुक्तांनी स्वत: सीताबर्डी, बडकस चौक, महाल, इतवारी व गांधीबाग आदी बाजार भागाचा दौरा केला. दुकानदारांशी चर्चा केली. कोविड संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. सोबतच निर्देशाचे उल्लघन करणाऱ्या दुकानदारांना दंड आकारण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला दिले.
यावेळी वाहतूक पोलीस विभागाचे डीसीपी सारंग दाभाडे, मनपाचे अपर आयुक्त संजय निपाने, झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते. सीताबर्डी मुख्य रस्त्यावर वाहतुकीला बंदी घातल्याने ग्राहकांना सुविधा झाली आहे. आयुक्तांनी व्हेरायटी चौक ते लोखंडी पुलापर्यंत पायी चालून गर्दीचे अवलोकन केले. काही दुकानदारांशी चर्चा केली. नियमांचे पालन करण्याची ग्वाही दुकानदारांनी दिली.
त्यानंतर महाल भागातील बडकस चौकात आयुक्तांनी पाहणी केली. येथे गर्दी होती. काही दुकानदार व ग्राहक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी त्यांच्यावर दंड आकारण्याचे निर्देश दिले. रस्त्यालगत लावण्यात आलेल्या दुकानाचे अतिक्रमण पथकाने हटविले. या भागात दिवसभर अतिक्रमण निर्मूलन पथक फिरत होते. यावेळी प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांचे पथक व पोलीस जवान गांधीबाग बाजार परिसरात दिवसभर गर्दीवर नजर ठेवून होते.