नागपुरात दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठात झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:34 PM2018-11-06T22:34:19+5:302018-11-06T22:51:26+5:30

दिवाळीच्या पूर्वसंध्येला विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. वेतन आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्गाची खरेदी जोरात आहे. आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर दिसून आला. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशीही सराफांकडे ग्राहकांची गर्दी होती. शहरातील विविध भागांतील मॉलमध्ये ग्राहकांची संख्या तुलनेत वाढली आहे. 

Crowd in shopping market for Diwali in Nagpur | नागपुरात दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठात झुंबड

नागपुरात दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठात झुंबड

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्वसंध्येला घरगुती वस्तूंची खरेदी : चायनीज दिव्यांच्या माळांना मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. वेतन आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्गाची खरेदी जोरात आहे. आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर दिसून आला. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशीही सराफांकडे ग्राहकांची गर्दी होती. शहरातील विविध भागांतील मॉलमध्ये ग्राहकांची संख्या तुलनेत वाढली आहे. 


कापड व्यावसायिक अजय मदान म्हणाले, गेल्या काही दिवसांपेक्षा रविवारी ग्राहकांची गर्दी वाढली होती. लहान मुले आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी केली. बुधवारी कपड्यांच्या खरेदीवर पुन्हा भर राहील. मध्यवर्ती भागात आलेल्या ग्राहकांना वाहन पार्किंगचा प्रश्न भेडसावत होता. काहींनी लगतच्या रस्त्यावर, मोकळ्या जागेत वाहने उभी करून खरेदीला जाणे पसंत केले. नोकरीधंद्यानिमित्त व्यग्र असणाऱ्या काहीच नागरिकांनी आॅनलाईन शॉपिंगला पसंती दिली.

दिव्यांच्या माळांना मागणी 

गांधीबाग आणि सीताबर्डी येथील बाजारपेठेत घरसजावटीच्या दिव्यांच्या माळांना प्रचंड मागणी आहे. गांधीबाग भागातील इलेक्ट्रिक दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. विशेषत: चीनच्या माळांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दिव्याच्या संख्येनुसार माळांची किंमत आहे. ५० रुपये ते २ हजार रुपयांपर्यंत माळा असल्याचे विक्रेते म्हणाले.
किरकोळ दुकाने आणि मॉलमध्ये गर्दी 

एम्प्रेस मॉल आणि शहरातील मोठ्या मॉलसह घाऊक व किरकोळ दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. महाल, गांधीबाग, इतवारी, सीताबर्डी, सदर, खामला, सक्करदरा, जरीपटका, हिंगणा या परिसरांतील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी असून मॉल, बिग बाजार, डी-मार्ट गर्दीने फुलले आहेत. दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या साईटवर आॅफर सुरू आहेत. आॅनलाईन वस्तू तुलनेने माफक किमतीत उपलब्ध असतानाही यंदा विक्रीत घसरण झाल्याची माहिती आहे.

यंदा आॅनलाईन खरेदी कमीच  

भारतीय ग्राहक कोणत्याही मोठ्या वस्तूंची खरेदी हाताळून आणि निरखून पाहिल्याशिवाय करीत नाहीत. गेल्यावर्षीपर्यंत जोमात असलेली आॅनलाईन बाजारपेठेत यंदा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, मोबाईल आदी वस्तू कुटुंबासह खरेदीची परंपरा आहे. त्यामुळे आॅनलाईन खरेदी करताना ग्राहक विचार करतो. अखेर दुकानात जाऊन आवडीची वस्तू खरेदी करतो. याशिवाय दागिन्यांची आॅनलाईन खरेदीला अपवाद आहे. ग्राहक आजही पारंपारिक सराफांकडूनच दागिने खरेदी करीत आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या आॅनलाईन दागिने विक्रीला ग्राहकांची पाठ फिरविल्याचे सोना-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले. 


नव्या फटाक्यांची बाजारात रेलचेल

फराळ, रांगोळी, आकाशकंदिलाबरोबरच फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळीचा उत्साह साजराच होऊ शकत नाही. ध्वनिप्रदूषणाबाबतची जागरुकता वाढत असल्याने रोषणाईच्या फटाक्यांचे अनेकविध प्रकार यंदा बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षी भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढल्यानंतरही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. विविध वयोगटांनुसार फटाक्यांचे प्रकार यंदा बाजारपेठेत दाखल झाले आहेत. ध्वनिप्रदूषण कमी करण्याचे अनेक प्रयत्न होत असताना कमी आवाजाचे फटाके मोठ्या संख्येने दुकानांमध्ये दाखल झाले आहेत. पारंपरिक फटाक्यांसह हवेतील एरियल प्रकारांना यंदा चांगली मागणी आहे. सोबत मिनी फाऊंटन, डिस्को फ्लॅश, रेल्वे सिग्नल हे नवे प्रकार बाजारात आहेत. रंगसंगती आणि कमी आवाज यांच्यात वैविध्य आणले आहे. गोल्ड रश, रोषणाईसह सुगंध देणारे कलर स्मोक या प्रकारांना मोठी मागणी आहे. कारगील बुलेट, मल्टिकलर कॅन्डल या प्रकारांचीही रेलचेल आहे. सुतळी बॉम्ब, माळ, मोठी लडी अशा आवाजाच्या फटाक्यांकडे ग्राहकांनीच पाठ फिरविली आहे. त्यातही कंपन्यांनी रोषणाईच्या फटक्यांचे अनेक प्रकार आणल्याने त्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. ‘गोल्ड व्हिसल’ या प्रकारात फटाका पेटविल्यानंतर शिट्टीचा आवाज अनुभवता येणार आहे. ‘डिस्को फ्लॅश’मध्ये फटक्यांसह रोषणाईचा आनंद घेता येणार आहे. 

 

Web Title: Crowd in shopping market for Diwali in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.