सीताबर्डीत गर्दीमुळे वाढले कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:13 PM2020-05-18T22:13:31+5:302020-05-18T22:15:56+5:30
जवळपास दोन महिन्यानंतर सीताबर्डी बाजारातील दुकाने सोमवारी सुरू झाली, पण ग्राहकांच्या गर्दीमुळे फि जिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मोदी नं. ३. हनुमान गल्ली आणि सीताबर्डी मुख्य मार्गावर मनपाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून सर्वच दुकाने सुरू झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जवळपास दोन महिन्यानंतर सीताबर्डी बाजारातील दुकाने सोमवारी सुरू झाली, पण ग्राहकांच्या गर्दीमुळे फि जिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मोदी नं. ३. हनुमान गल्ली आणि सीताबर्डी मुख्य मार्गावर मनपाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून सर्वच दुकाने सुरू झाली. मोबाईल विक्रीचे दुकानदार बाहेर दुरुस्तीचे बोर्ड लावून आत मोबाईलची विक्री करीत असल्याचे दिसत होते. पोलीस गर्दी पाहून परत गेले, पण मनपा अधिकाऱ्यांनी गर्दीची पाहणी केलीच नाही.
दोन महिन्यानंतर दुकाने उघडल्याने दुकानदारांमध्ये उत्साह होता. या भागात जवळपास १५० दुकाने आहेत. त्यापैकी मोदी नं. ३, हनुमान गल्ली, जानकी टॉकीजसमोर आणि मुख्य मार्गावर मोबाईल, इलेक्ट्रिॉनिक्स, इलेक्ट्रिक, कपड्यांची दुकाने आहेत. यात मोबाईलची सर्वाधिक ६० ते ७० दुकाने आहेत. ही सर्वच दुकाने सोमवारी सुरू होती. मनपाच्या परिपत्रकात ‘स्टॅण्ड अलोन शॉप’ असा उल्लेख आहे. अर्थात एकाच रांगेत एकाच प्रकारच्या वस्तूची पाच दुकाने असतील तर त्यापैकी एकच दुकान सुरू ठेवण्याचा नियम आहे. पण या नियमाचे सपशेल उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. शिवाय निवासी भागात दुकान सुरू करण्याची परवानगी आहे. पण दुकानदारांनी सुरू करणे म्हणजे लॉकडाऊनचे उल्लंघन असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.
पूर्ण मार्केट उघडण्याची परवानगी नाही
मनपाच्या परिपत्रकानुसार संपूर्ण मार्केट उघडण्याची परवानगी नाही. त्यानंतर दुकानदारांनी दुकाने सुरू करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. सर्वांनीच दुकाने सुरू करून गर्दी गोळा केली. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्याऐवजी जास्त वाढला आहे. मार्केट सुरू करताना मनपाचे अधिकारी हजर असायला हवे होते. पण आज तसे झाले नाही. प्रत्येकाने आपापल्या मर्जीने दुकाने सुरू करून कोरोनाला आमंत्रण दिले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सोमवारी रेडिमेड कपडे आणि सायकल विक्रीची दुकाने बंद होती.