नागपुरातील पिपळा रोडवरील भाजीबाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 10:55 PM2020-04-18T22:55:36+5:302020-04-18T22:57:01+5:30
शहराच्या विविध भागात भाजीबाजाराला परवानगी देण्यात आली आहे. परंतु सामाजिक अंतर ठेवूनच मालाची खरेदी व विक्री करण्याला अनुमती आहे. असे असूनही दक्षिण नागपुरातील पिपळा रोडवरील भाजीबाजारात गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला यातून वगळण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात भाजीबाजाराला परवानगी देण्यात आली आहे. परंतु सामाजिक अंतर ठेवूनच मालाची खरेदी व विक्री करण्याला अनुमती आहे. असे असूनही दक्षिण नागपुरातील पिपळा रोडवरील भाजीबाजारात गर्दी होत आहे. शनिवारी सकाळी या बाजारात खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. यातून संसर्ग होण्याचा धोका आहे. पिपळा रोड परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिसरातील नागरिकांची सुविधा व्हावी यासाठी पिपळा बाजार भरण्याला परवानगी देण्यात आली. दररोज भरणाऱ्या या बाजारात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. भाजीपाल्याच्या वाहनांचीही वर्दळ वाढली आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. गर्दीमुळे कॉटन मार्केट येथील भाजीबाजार बंद करण्यात आला. रेशीमबाग येथील बाजारही बंद करण्यात आला. पिपळा रोडवरील बाजारात सोशल डिस्टन्स न पाळल्यास हा बाजार बंद करावा लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.