खासगी ट्रॅव्हल बसेसवर उसळत आहे गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:08 AM2021-03-20T04:08:02+5:302021-03-20T04:08:02+5:30
- वसूल केले जात आहे दुप्पट भाडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोना संक्रमण अनियंत्रित झाले आहे. दररोज ...
- वसूल केले जात आहे दुप्पट भाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोना संक्रमण अनियंत्रित झाले आहे. दररोज तीन हजाराच्या वर संक्रमित आढळत असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. अशास्थितीत बाहेरून कामासाठी नागपुरात आलेले आणि ज्यांचे नातेवाईक दुसऱ्या राज्यात आहेत, ते नागरिक मोठ्या संख्येने पलायन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच रेल्वे स्टेशन व खासगी ट्रॅव्हल्स अड्ड्यांवर प्रवाशांची गर्दी उसळायला लागली आहे. प्रवाशांच्या या अडचणीचा लाभ म्हणा वा नुकसानभरपाई करण्यासाठी ट्रॅव्हल्स संचालकांकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. हे भाडे दुप्पट ते तिप्पट आहे. नागपूर ते इंदूर, जबलपूर, रायपूर, भोपाळ, हैदराबाद, पुणे, नाशिक, मुंबई आदींकरिता प्रवासी रेल्वे तिकीट बुक करत आहेत. याच मार्गावर ट्रॅव्हल्स बसमध्येही मोठ्या संख्येने प्रवासी जात आहेत. काहीच दिवसावर होळी सण आहे आणि त्यामुळे अनेक लोक आपल्या गावाकडे, शहराकडे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स व ट्रेनचे तिकीट बुक करत आहेत. याचदरम्यान मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसला नो एन्ट्रीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भोपाळ, इंदूरकडे जाणाऱ्या बसेसचे भाडे मनमाने वसूल केल्या जात आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांना बसअड्ड्यावर सोडणाऱ्या ऑटोचालकांनाही ट्रॅव्हल्स संचालकांकडून कमिशन दिले जात आहे. याद्वारे ऑटोचालकही आपली नुकसानभरपाई करण्यासाठी ट्रॅव्हल्स ऑफिससोबत सेटिंग करत आहेत. टाळेबंदीमुळे होळीला आपल्या गावाकडे जाणाऱ्यांची संख्या खालावल्याने, नुकसान होत असल्याने, जादा रक्कम घेऊन तिकीट दिले जात असल्याचे ट्रॅव्हल्स संचालक सांगत आहेत.
..............