रिपोर्टसाठी केंद्रावर गर्दी, संक्रमणाचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:07 AM2021-04-22T04:07:39+5:302021-04-22T04:07:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोविड प्रकोप थांबताना दिसत नाही. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ हजारांच्या पुढे गेली ...

Crowds at the center for reports, increased risk of infection | रिपोर्टसाठी केंद्रावर गर्दी, संक्रमणाचा धोका वाढला

रिपोर्टसाठी केंद्रावर गर्दी, संक्रमणाचा धोका वाढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोविड प्रकोप थांबताना दिसत नाही. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज सहा ते सात हजार रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रूग्णांसोबतच आरटीपीसीआर व अ‍ँटिजेन टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दररोज २६ ते २७ हजारापर्यंत हा आकडा गेला आहे. चाचणी करणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने लॅबकडून वेळेवर रिपोर्ट मिळत नाही. मोबाईलवर मेसेज न आल्याने रिपोर्टची चौकशी करण्यासाठी केंद्रावर लोकांची गर्दी वाढली आहे. यातून संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात बाधितांची संख्या वाढली. एप्रिल महिन्यात प्रकोप आणखी वाढला. गृह विलगीकरणातील रूग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. संसर्ग टाळण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची वेळीच चाचणी होणे गरजेचे आहे. यामुळे चाचणी केंद्रासोबतच लॅब वरील कामाचा भार वाढला आहे. शासकीय रूग्णालयात रिपोर्ट मिळण्याला तीन -चार दिवस लागतात. पॉझिटिव्ह आहे की नाही याची खात्री होईपर्यंत बाधितांचा मुक्त संचार सुरू आहे. तपासणी करणाऱ्यांत २५ टक्के बाधित येत आहेत. यामुळे रिपोर्टच्या चौकशीसाठी होणाऱ्या गर्दीतही बाधित असल्याने संक्रमण वाढत आहे. मनपा प्रशासन वाढत्या रूग्णसंख्येमुळे हतबल झाले आहे. त्यात कान्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने ही प्रक्रिया जवळपास ठप्पच आहे.

.....

खासगी लॅबमध्ये आठवड्यानंतर रिपोर्ट

शासकीय रूग्णालय व मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावर होणारी गर्दी विचारात घेता खासगी लॅबमध्ये चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु खासगी लॅबचा रिपोर्ट सात-आठ दिवसानंतर मिळत आहे. रिपोर्ट नसल्याने वेळीच उपचार करता येत नाही. रिपोर्टच्या प्रतीक्षेत प्रकृती गंभीर होण्याचे प्रकार वाढले आहे. उशिराने औषधोपचार सुरू झाल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.

....

हॉटस्पॉट भागातही रिपोर्ट उशिराच

हनुमाननगर, लक्ष्मीनगर, मंगळवारी,धरमपेठ, नेहरूनगर व धंतोली झोन भागात सर्वाधिक हॉटस्पॉट आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी होणे गरजेचे आहे. चाचणी रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणे अपेक्षित आहे. परंतु रिपोर्ट उशिरा मिळतो. यादरम्यान संबंधित व्यक्तीला लक्षणे नसल्याने तो सर्वत्र भटकंती करतो. अशा व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

Web Title: Crowds at the center for reports, increased risk of infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.