मासेमारीसाठी कन्हान नदीत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:18 AM2020-12-03T04:18:58+5:302020-12-03T04:18:58+5:30
खापरखेडा : भानेगाव-पारशिवनी दरम्यानच्या कन्हान नदीवरील पुलाजवळ मंगळवारी (दि. १) दिवसभर पात्रात मासेमारी करणाऱ्यांची गर्दी दिसून आली. त्यात ढिवर ...
खापरखेडा : भानेगाव-पारशिवनी दरम्यानच्या कन्हान नदीवरील पुलाजवळ मंगळवारी (दि. १) दिवसभर पात्रात मासेमारी करणाऱ्यांची गर्दी दिसून आली. त्यात ढिवर बांधवांसह लहानग्यांपासून माेठ्यांचा समावेश हाेता. पात्रात विविध जातींचे मासे वाहत येत असल्याची माहिती मासेमारी करणाऱ्यांनी दिली असून, ते मासे काेणत्या जातीचे आहेत, हे मात्र ते सांगू शकले नाहीत.
खापरखेडा परिसरात कन्हान नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. या नदीवर भानेगाव-पारशिवनी दरम्यान पूल असून, या पुलाजवळील नदीच्या पात्रात मंगळवारी मासेमारी करणाऱ्यांची गर्दी दिसून आली. यात ढिवर बांधवांची संख्या माेठी हाेती. ते पात्रात दूरवर विखुरले हाेते. काही पात्रात जाळे टाकून तर काही काठावर गळ टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न करीत हाेते.
हा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळाल्याने तसेच संपूर्ण पात्रभर मासेमारी करणारे दिसत असल्याने प्रत्येक वाहनचालक पुलावर थांबून ही मासेमारी बघत हाेता. पुलावरून मासेमाऱ्यांचे चित्रही माेहक दिसत हाेते.
---
खरेदीदारांची धाव
कन्हान नदीच्या पात्रात मासेमारी सुरू असल्याची माहिती लगेच परिसरात पाेहाेचली. त्यामुळे शाैकिनांनी ताजे मासे खरेदी करण्यासाठी नदीकडे धाव घेतली हाेती. काहींनी चांगल्या किमतीत माेठमाेठे मासे खरेदी केले. विक्रेत्यांकडे माशांचे वजन करायला तराजू नसल्याने त्यांनी ते नगाप्रमाणे विकून पैसा कमावला. तराजूअभावी अनेकांना माशांची मागणी असूनही ठाेक विक्री केली नाही. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या जातीचे मासे दिसून येत हाेते. मात्र, नाव कुणालाही माहिती नव्हते.