पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:58+5:302021-05-29T04:06:58+5:30
नागपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते सायंकाळी ...
नागपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू आहेत. वेळेच्या मर्यादेमुळे पंपावर ग्राहकांची गर्दी वाढली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. सध्या संसर्ग कमी झाल्याने १ जूनपासून पंप नियमित वेळेत सुरू करण्याची विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची मागणी आहे.
लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहेत. याशिवाय अनेकांची प्रतिष्ठाने बंद आहेत. शिवाय वर्क फ्रॉम होममुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. कामामुळे नोकरदार, उद्योगांमधील कामगार आणि व्यावसायिक सकाळी पेट्रोलचा भरणा करू शकत नाही. सायंकाळी ७ पर्यंत वेळेची मर्यादा असल्याने पंपावर वाहनचालकांची गर्दी वाढली आहे.
असोसिएशनचे उपाध्यक्ष बग्गा म्हणाले, इंधन जीवनावश्यक वस्तूच्या सूचित येते. वेळेच्या बंधनामुळे वाहनचालकांची होणारी गर्दी आणि कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वेळेचे निर्बंध लावण्याचा निर्णय योग्य आहे. अनेक जण नोकरीवरून घरी परतताना पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करतात. अशावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. पंपावर होणारी गर्दी नियंत्रणासाठी पंप संचालक आणि कर्मचारी प्रयत्नरत आहेत. पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाहनचालकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा धोका टळल्यानंतर प्रशासनातर्फे वेळेचे निर्बंध काढण्याची अपेक्षा आहे.
पेट्रोल आणि डिझेल विक्रीत घसरण
नागपुरात जवळपास ८५ पेट्रोल पंप असून, तेल कंपन्या आणि पोलीस प्रशासनातर्फे संचालित १० पेट्रोल पंप आहेत. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे पंपावर पेट्रोल आणि डिझेलची विक्री जवळपास ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. रुग्ण कमी झाल्यानंतर स्थिती सुधारत आहे. प्रत्येक पंपावर आता पेट्रोलची विक्री वाढत आहे.